जगातील प्रभावशाली नेतृत्त्व म्हणजे गांधी विचार : डॉ. के.बी. पाटील
जळगाव, 10 नोव्हेंबर (हिं.स.) राष्ट्रपिता महात्मा गांधीजींकडे शरिरयष्टी, पद, सत्ता किंवा वकृत्व सुद्धा म्हणावे तसे प्रभावशाली नव्हते, तरीसुद्धा जगातील प्रभावी नेतृत्त्व म्हणून त्यांच्याकडे संपूर्ण जग अग्रक्रमाने पाहते. याचे कारण आजच्या तरूणांनी शोधल
जगातील प्रभावशाली नेतृत्त्व म्हणजे गांधी विचार : डॉ. के.बी. पाटील


जळगाव, 10 नोव्हेंबर (हिं.स.) राष्ट्रपिता महात्मा गांधीजींकडे शरिरयष्टी, पद, सत्ता किंवा वकृत्व सुद्धा म्हणावे तसे प्रभावशाली नव्हते, तरीसुद्धा जगातील प्रभावी नेतृत्त्व म्हणून त्यांच्याकडे संपूर्ण जग अग्रक्रमाने पाहते. याचे कारण आजच्या तरूणांनी शोधले पाहिजे. प्रत्येकात असलेल्या वेगळेपणाला गांधीजींनी महत्त्व दिले. गांधीजींप्रमाणे जीवनशैली आजच्या युगात जगणे शक्य नसेलही मात्र त्यांचे सत्य, अहिंसा, अपरिग्रहाचे विचार आपल्या आचरणात आणले पाहिजे. यातूनच सशक्त समाजाची निर्मिती होईल, यासाठी ‘नागरिकता’ ही संकल्पना स्वत: तपासून घ्यावी, त्यासाठी तरूणांनी पुढे यावे, असे आवाहन अध्यक्षीय मनोगतामध्ये गांधी रिसर्च फाऊंडेशनचे विश्वस्त तथा उत्तर महाराष्ट्र विद्यापिठाचे माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील यांनी केले.गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या नॅशनल गांधीयन लीडरशिप शिबिर-२०२५ च्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते.

जैन हिल्सच्या परिश्रम हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर फाऊंडेशनचे विश्वस्त व जैन इरिगेशन सिस्टिम्सचे अध्यक्ष अशोक जैन, गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. सुदर्शन अय्यंगार, रामदत्त त्रिपाठी, अंबिका जैन उपस्थित होते. त्यांच्यासह यावेळी संस्थेच्या संशोधन विभागाच्या अधिष्ठाता डॉ. गीता धर्मपाल, ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई, समन्वयक उदय महाजन, सुधीर पाटील यांचीही उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सहभागींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगढ, महाराष्ट्र, त्रिपूरा, गुजरात, तेलंगणा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, दिल्ली अशा १६ राज्यांतून अभ्यासकांनी या नॅशनल गांधीयन लीडरशिप कॅम्प-२०२५ मध्ये सहभाग घेतला. १२ दिवस चाललेल्या या शिबिरांमध्ये झालेल्या उपक्रमांवर आधारित एक बुलेटियन प्रकाशित करण्यात आली. त्याचे प्रकाशन उपस्थितांच्या हस्ते झाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande