
नाशिक, 10 नोव्हेंबर (हिं.स.)।
पतीच्या अनैतिक संबंधाला विरोध करणाऱ्या विवाहितेला फारकत न देता तिच्या मैत्रिणीशी दुसरा विवाह करून विवाहितेला घराबाहेर हाकलून दिल्याप्रकरणी पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी विवाहितेचे म्हसरूळ परिसरात माहेर आहे. ही विवाहिता दि. २८ मे २०१७ ते २० सप्टेंबर २०२५ या कालावधीत आंबिवली (ता. कल्याण, जि. ठाणे) येथे सासरी नांदत होती. आरोपी पती सागर बनसोडे, सासू, सासरे व दीर यांनी संगनमत करून विवाहितेने माहेरून घर घेण्यासाठी पैसे आणावेत, या कारणावरून शिवीगाळ व दमदाटी केली, तसेच फिर्यादीच्या पतीचे जुही नावाच्या महिलेसोबत अनैतिक संबंध आहेत. पतीला विरोध केला असता त्याने तू मला फारकत दे, असे म्हणून तिला त्रास दिला. मला जुहीसोबत लग्न करायचे आहे, असे बोलून तिला धमकावले. त्यानंतर फिर्यादीला फारकत न देता तिच्या पतीने जुहीसोबत दुसरा विवाह केला. त्याला विरोध केला असता पतीने सासरच्या लोकांनी विवाहितेला शिवीगाळ करून घरातून हाकलून दिले. यासाठी तिच्या मैत्रीणीच्या आई-वडिलांनीदेखील विवाहितेला त्रास देऊन तिच्या पतीला मैत्रीणीशी विवाह करण्यास प्रोत्साहन दिले, असे पिडीतेने तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात सासरच्या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जोशी करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV