
नाशिक, 10 नोव्हेंबर (हिं.स.)स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये नाशिक जिल्ह्यात महाविकास आघाडी एकत्रित निवडणूक लढणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील राज्यात प्रथमच नाशिकमध्ये महाविकास आघाडीमध्ये सहभागी झाली आहे त्याची अधिकृत घोषणा संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आली असली तरी यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी देखील मनसे सोबत असल्याचे दिसून आले
राज्यामध्ये होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी नाशिक मध्ये सुरू झाल्यानंतर सोमवारी एका संयुक्त पत्रकार परिषद संपन्न झाली या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष दिनकर पाटील, सलीम शेख, अखिल भारतीय काँग्रेसचे राहुल दिवे, शिवसेना उबाठाचे वसंत गीते, विनायक पांडे, माकपाचे डॉक्टर डी एल कराड ,तानाजी जायभावे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष गजानन शेलार, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना माकपचे डॉ डी. एल. कराड म्हणाले की, सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. सर्वांनी एकत्रित निवडणुका लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी सर्व निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय आहे. राज्यात भ्रष्टाचाराचे थैमान आहे. जाती जातीत भांडण लावण हेच काम सरकारकडून होत आहे. महाराष्ट्रात येत्या निवडणुकांमध्ये महायुतीचा प्रभाव कमी करण्यासाठी आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला.” असे त्यांनी स्पष्ट केले. “आम्ही जनतेच्या बाजूने उभे राहणार आहोत. फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या हातात सगळी सत्ता आहे. असा आरोप केला आहे.
मनसे नेते दिनकर पाटील यावेळी म्हणाले की, आज संयुक्त बैठक आयोजित केलेली आहे. लोकशाही जिवंत राहण्यासाठी हा निर्णय घेतला. देशात राहुल गांधी यांनी मत चोरीवर सरकार आल्याचे निदर्शनास आणून दिले. मुंबईत एकत्रित मोर्चा झाला. 96 लाख दुबार मतदार आहेत. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनेदेखील मतदार याद्यांमध्ये घोळ झाल्याचे सांगितले आहे. जनतेला न्याय मिळाला पाहिजे. ओला दुष्काळ, कर्जमाफी यासाठी आम्ही लढत आहोत.” असे ते म्हणाले.
मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडी आणि मनसेने एकत्रितपणे मोर्चा काढला होता. यावेळीही काँग्रेस या मोर्चात सहभागी होणार का? याकडे सर्वांचे लक्ष होते. यावेळी हर्षवर्धन सपकाळ जरी या मोर्चात नसले तरीही ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेस आणि मनसेचे अनेक पदाधिकाऱ्यांनी या मोर्चाला हजेरी लावली होती. तरीही, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी मनसे मविआसोबत युती करणार का? हा प्रश्न अनुत्तरीतच होता. वरिष्ठ पातळीवरील एकाही नेत्याने याबाबत जाहीरपणे घोषणा केली नव्हती. दरम्यान, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी विजय तुमचा होणार असेल तर तुम्ही तुमच्या पातळीवर मनसेसोबत जा किंवा जो निर्णय घ्यायचा तो घ्या, असे स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सांगितले आहे. त्याप्रमाणे नासिक मध्ये मनसेसोबत काँग्रेस देखील सहभागी झाली आहे .
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV