
अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरे यांची प्रवक्तेपदावरून हकालपट्टी
मुंबई, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून नव्या प्रवक्त्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यासह गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वादग्रस्त वक्तव्यं करून पक्षाला अडचणीत आणणारे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) प्रवक्ते अमोल मिटकरी आणि रुपाली ठोंबरे-पाटील यांच्यावर पक्षाने मोठी कारवाई केली आहे. दोघांचीही प्रवक्तेपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यांमुळे महायुतीत तणाव निर्माण होत होता, तर रुपाली ठोंबरे यांनी फलटण येथील डॉक्टर तरुणी आत्महत्याप्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर तिखट टीका केली होती.
या प्रकरणानंतर पक्षाने रुपाली ठोंबरे पाटील यांना कारणे दाखवा नोटीसही दिली होती. नोटीसमध्ये ठोंबरे यांनी पक्षाच्या वरिष्ठ महिला नेत्या व राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांविरोधात केलेली वक्तव्ये ही पक्षशिस्त भंग करणारी असल्याचं नमूद करण्यात आलं होतं. त्यांना सात दिवसांत खुलासा सादर करण्यास सांगण्यात आले होते. दरम्यान, ठोंबरे यांनी अजित पवारांची भेट घेतल्यानंतर काही तासांतच त्यांच्या प्रवक्तेपदाची हकालपट्टी झाल्याने या घडामोडींना वेग आला आहे.
अमोल मिटकरी यांच्याही काही वक्तव्यांमुळे महायुतीतील सहयोगी पक्षांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. त्यामुळे पक्षाने त्यांच्याविरोधातही कारवाई करत प्रवक्तेपद काढून घेतले आहे. त्याचबरोबर वैशाली नागवडे आणि संजय तटकरे यांनाही प्रवक्तेपदावरून हटवण्यात आले आहे. तर, काही काळापूर्वी संभाजी ब्रिगेड कार्यकर्त्यांवर हल्ला केल्याच्या वादानंतर पद सोडलेल्या सुरज चव्हाण यांची पुन्हा एकदा पक्ष प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
नव्याने प्रवक्ते म्हणून अनिल पाटील, रुपाली चाकणकर, ब्रिजमोहन श्रीवास्तव, चेतन तुपे, आनंद परांजपे, अविनाश आदिक, सना मलिक, राजलक्ष्मी भोसले, सुरज चव्हाण, हेमलता पाटील, प्रतिभा शिंदे, विकास पासलकर, राजीव साबळे, प्रशांत पवार, श्याम सनेर, सायली दळवी आणि शशिकांत तरंगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule