
पुणे, 10 नोव्हेंबर (हिं.स.)।
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून सोमवारी राज्यातील १७ नव्या प्रवक्त्यांची नावे जाहीर करण्यात आली. त्यामध्ये पुण्यातून आमदार चेतन तुपे, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, विकास पासलकर यांची प्रवक्ते म्हणून नियुक्ती केली आहे.
तर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्यावर पक्षाने विश्वास दाखवत त्यांच्यावर तिसरी महत्त्वाची पक्ष प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपविली आहे. राज्यातील १७ जणांच्या खांद्यावर पक्ष प्रवक्तेपदाची जबाबदारी पक्षाने टाकली आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची भूमिका, ध्येय व धोरणे राज्य स्तरावर मांडण्याऐवजी प्रवक्त्यांकडून वैयक्तिक भूमिका मांडली जात असल्याबद्दल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुंबई येथील बैठकीत नाराजी व्यक्त केली होती. पवार यांच्या नाराजीनंतर पाचव्या दिवशी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी १७ जणांची प्रवक्ते पदाची नावे जाहीर केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु