
‘माझे माहेर पंढरी’ या अभंग गायनाने वातावरण भक्तीमय झाले
परभणी, 10 नोव्हेंबर (हिं.स.)।
ज्ञानेश ध्रुपद संगीत व शिक्षण प्रसारक संस्थेने आयोजित केलेल्या ‘द्वितीय नाद ज्योती’ या त्रैमासिक संगीत सभेत अभिषेक शिंदे यांच्या शास्त्रीय गायनासह प्रख्यात शहनाईवादक घनश्याम चंद यांच्या सुमधुर वादनाने रसिक मंत्रमुग्ध झाले.
वसमत रस्त्यावरील बी. रघुनाथ सांस्कृतिक सभागृहात आयोजित केलेल्या या सभेची सुरुवात परभणी येथील युवा गायक अभिषेक बालाजी शिंदे यांच्या राग चंद्रकौंसने झाली. यावेळी त्यांनी विलंबित एकतालमध्ये ‘आदिदेव महादेव’ ही बंदिश सादर केली. त्यानंतर द्रुत तीनतालमध्ये ‘भालचंद्र गलेभुजंग’ ही दुसरी बंदिश पेश करून रसिकांना वेळेचे भान विसरायला लावले. शास्त्रीय सादरीकरणानंतर त्यांनी अभंग आणि भजन गायनाला सुरुवात केली. ‘काय करू जीव होतो कासावीस’ आणि ‘माझे माहेर पंढरी’ या अभंग गायनाने वातावरण भक्तीमय झाले. ‘बाजे रे मुरलिया’ हे भजन आणि ‘ज्या सुखा कारणी’ हा अभंग सादर करून त्यांनी रसिक श्रोत्यांना तल्लीन केले. विशेष फरमाईशीने गायलेला त्यांच्या आवाजातील ‘कानडा राजा पंढरीचा’ हे भजन आणि ‘असा कसा देवाचा देव’ ही गौळण वन्स मोर घेत श्रोत्यांच्या मनात दीर्घकाळ घर करून राहिली. यावेळी त्यांना रामदास कुलकर्णी यांनी तबला साथ करून कार्यक्रमात रंगत भरली, हार्मोनियमवर कृष्णा लिंबेकर यांची समर्पक साथ लाभली आणि पखावजावर ऋतुराज भोसले यांनी सुंदर साथ दिली.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात देशातील प्रख्यात शहनाई वादक घनश्याम चंद (दिल्ली), जे पद्मविभूषण पं. हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य आहेत, यांनी आपल्या वादनाने श्रोत्यांना बांधून ठेवले. त्यांनी शांत आणि गंभीर राग पुरिया कल्याण मध्ये आपले वादन सादर केले. त्यानंतर त्यांनी विशेष फरमाईशी वरून कजरी धून वाजवून श्रोत्यांना भारतरत्न उस्ताद बिस्मिल्लाह खान यांची आठवण करून दिली आणि मिश्र भैरवी मधील धून पेश करून सभेला उच्च उंचीवर नेले. त्यांच्या शहनाई वादनाच्या लयीत आणि माधुर्याने रसिक भारावून गेले. अनेक दशकानंतर परभणीकरांनी शहनाई वादनाचा मनसोक्त आनंद घेतला. त्यांना तबल्यावर परभणी येथील जेष्ठ व प्रसिद्ध रमाकांत पैंजणे यांनी रंजक साथ दिली तर परभणीतीलच 15 वर्षीय प्रतिभावान गायक सोहम संदीप देशमुख याने हार्मोनियमवर साथ दिली. या कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक व संगीतप्रेमी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis