
पुणे, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। पिंपरी चिंचवड महापालिकेने शाश्वत, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक शहरी वाहतूक व्यवस्थेसाठी राबवलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली आहे. या उपक्रमांसाठी महापालिकेला केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयामार्फत “शहरी वाहतूक उत्कृष्टता पुरस्कार” प्रदान करण्यात आला आहे.
नवी दिल्ली येथे झालेल्या अर्बन मोबिलिटी परिषदेत केंद्र सरकारच्या वतीने केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्री मनोहर लाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. याप्रसंगी हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंह सैनी,केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार राज्यमंत्री तोखन साहू,भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव श्रीनिवास कटिकिथला,विशेष कार्यकारी अधिकारी जयदीप यांच्यासह केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
महापालिकेच्या वतीने अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे,सहशहर अभियंता बापू गायकवाड,कार्यकारी अभियंता सुनिल पवार तसेच आयटीडीपी इंडिया संस्थेचे प्रांजल कुलकर्णी आणि आशिक जैन यांनी हा सन्मान स्वीकारला.“सर्वाधिक नाविन्यपूर्ण वित्तीय यंत्रणा असलेले शहर” या श्रेणीत हा पुरस्कार महापालिकेला प्राप्त झाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु