परभणीत सातही पालिकांच्या आखाड्यात बैठकांचे सत्र आणि चर्चेचे गुर्‍हाळ
परभणी, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। परभणी जिल्ह्यातील सातही नगरपालिकांच्या कार्यक्षेत्रात आज सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली खरी परंतु, सातही पालिकांच्या राजकीय आखाड्यात युती व आघाडीबाबत बैठकांचे सत्र अन् पक्षांतर्ग
परभणीत सातही पालिकांच्या आखाड्यात बैठकांचे सत्र आणि चर्चेचे गुर्‍हाळ


परभणी, 10 नोव्हेंबर (हिं.स.)।

परभणी जिल्ह्यातील सातही नगरपालिकांच्या कार्यक्षेत्रात आज सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली खरी परंतु, सातही पालिकांच्या राजकीय आखाड्यात युती व आघाडीबाबत बैठकांचे सत्र अन् पक्षांतर्गत इच्छुकांबरोबर मुलाखतीच्या कार्यक्रमांसह चर्चेचे गुर्‍हाळ सुरुच आहे. त्यामुळेच सातही पालिकेत जागा वाटपासह उमेदवार निवडीबाबत संभ्रमावस्था कायम आहे.

नगरपालिकांच्या निवडणूकीचा कार्यक्रम आयोगाने जाहीर केला. पाठोपाठ आदर्श आचारसंहितासुध्दा लागू झाली. त्याबरोबरच या जिल्ह्यातील सातही नगरपालिकांतर्गत मातब्बर नेतेमंडळींसह प्रमुख राजकीय पक्षांचे इच्छुक उमेदवार तसेच हौसे-नवसे-गवसे सुध्दा अक्षरशः अंग झटकून आपआपल्या कार्यक्षेत्रात कामाला लागले. त्याचा परिणाम त्या त्या पालिकांच्या कार्यक्षेत्रात राजकीय वातावरण अक्षरशः पेटले. सत्तारुढ व विरोधी पक्षातील म्हणजे महायुती व महाविकास आघाडीतील नेतेमंडळींनी या निवडणूकांचे महत्व ओळखून व इच्छुकांची भाऊगर्दी ओळखून युती व आघाडीबाबत सावध भूमिका घेतली. विशेषतः स्वबळाचा नारा देतेवेळी मित्र पक्षाबरोबर निश्‍चितच योग्य ठिकाणी सन्मानजनक जागा वाटपसुध्दा करु, अशी दुहेरी निती अवलंबविली. त्यामुळेच त्या त्या पालिकांच्या कार्यक्षेत्रात युती व आघाडीतील ऐक्या बाबत कमालीची संभ्रमावस्था निर्माण झाली. ती अद्यापही कायम आहे.

सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला खरा, परंतु सातही नगरपालिकांच्या राजकीय आखाड्यात सत्तारुढ व विरोधी पक्षाच्या नेतेमंडळींनी युती व आघाडीबाबत सोमवारी सायंकाळपर्यंत स्पष्टतासुध्दा केली नाही. एकीकडे तडजोडीची भाषा करतेवेळी पडद्याआड स्वबळावर निवडणूक लढविण्याच्याही हालचाली सुरु ठेवल्या. त्यामुळेच इच्छुकांनीसुध्दा सावध पावित्रा स्विकारला. सोमवारी सायंकाळपर्यंत एकाही मातब्बर इच्छुकाने उमेदवारी अर्ज दाखल केला नाही.

17 नोव्हेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असणार आहे. त्यामुळे आणखी सात दिवस हाताशी आहेत. त्यामुळेच पडद्याआड व्यूहरचना करतेवेळी नेतेमंडळींनी आपआपले पत्ते, डावपेच, रणनिती वगैरे गोष्टी गुपित ठेवण्याच्या खेळ्या खेळल्या आहेत. त्यामुळे इच्छुक चांगलेच गांगरले आहेत. विशेषतः कुंपणावर असणारे इच्छुक पेचात सापडले आहेत. या संभ्रमावस्थेत नेमकी काय भूमिका घ्यावी? हेच या इच्छुकांना कळेनासे झाले आहे. तर आपआपल्या ‘गॉडफादर’ मार्फत उमेदवारीचा शब्द मिळवून काही मातब्बर इच्छुकांनी उमेदवारी यादी जाहीर होईल तेव्हा होईल, आपआपल्या कार्यक्षेत्रात भक्कम अशी मोर्चेबांधणी करीत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा चंग बाधला आहे.

एकंदरीत या जिल्ह्यातील सातही नगरपालिकांच्या राजकीय आखाड्यातील मैत्रीपूर्ण लढतींबाबत, बैठकांचे सत्र, जागा वाटपासह उमेदवार निवडीबाबत चर्चेचे गुर्‍हाळ, तसेच पडद्याआड एकमेकांना शह-काटशह द्यावयाच्या खेळ्यांसंदर्भात जोरदार अशा हालचाली करीत संपूर्ण वातावरण चांगलेच पेटवून दिले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande