
रायगड, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। माजी भारतीय क्रिकेटपटूंबाबत ईडी प्रकरण ताजं असतांनाच नवी मुंबई पोलिसांनी प्रतिबंधित ऑनलाईन गेमिंग व सायबर फ्रॉड करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा भंडाफोड़ करून मोठी भरती केली आहे. या टोळीकडून देशभरातील नागरिकांची सुमारे ₹८४ कोटी फसवणूक झाल्याचे नवी मुंबई गुन्हे शाखेने सांगितले आहे.
पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आरोपींचा तंत्र असा होता की ते गेम खेळा आणि पैसे दुप्पट करा अशा आमिषाने लोकांना आकर्षित करीत होते. लोकांना विविध वेबसाईट्स व अॅप्स (उदा. www.Ramesh247.com, www.upi9.Pro.com
, www.Reddybook.blue
) डाउनलोड करून त्यात पैसे गुंतवण्यास सांगितले जात होते. एकदा रक्कम जमा झाल्यावर गेम बंद करून खाते ब्लॉक केले जात होते. या प्रकरणात देशभरातून १२ आरोपींना नवी मुंबई, डोंबिवली व पुणे येथून अटक करण्यात आली असून, तपासात या टोळीकडून वापरले गेलेले ८८६ विविध बँक खाते उघडकीस आले आहेत. तसेच या टोळीसाठी वापरली जात असलेली खातेय़े शेअर मार्केट फ्रॉड, नोकरीच्या जाहिरातीचे रॅकेट व वर्क-फॉर्म-होम फसवणुकींसाठीही वापरली जात असल्याचा खुलासा झाला आहे.
या कारवाईमुळे नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवरील (NCCRP) ३९३ तक्रारींवर छडा लागला आहे, असे पोलीसांनी दिलेल्या माहितीत नमूद केले. पोलीसांनी आरोपींकडून तपासादरम्यान ५२ मोबाईल फोन, ७ लॅपटॉप, ९९ डेबिट कार्डे, ६४ धनादेश पुस्तिका व एक टाटा सफारी स्टॉर्म ही गाडी असा एकूण ₹१८.०५ लाख किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. नवी मुंबई पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की कोणतीही अनोळखी लिंक, संदिग्ध ऑनलाईन गेमिंग अॅप किंवा व्हॉट्सॲप गुंतवणूक गटात सामील होऊ नयेत; पैशांचे आमिष दाखवणाऱ्या प्लॅटफॉर्मवर सावधानता बाळगावी, संशयास्पद व्यवहार आढळल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क करावा, असे पोलिसांनी सुचित केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके