
सोलापूर, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। सोलापूर विमानतळाच्या परिसरात उडविलेल्या पतंगाचा मांजा मुंबई-सोलापूर विमानाच्या पंख्यात अडकला. त्यानंतर शहर पोलिस, महापालिका व विमानतळ प्राधिकरण खडबडून जागे झाले. हा धोका पुन्हा होऊ नये म्हणून एमआयडीसी पोलिसांनी विमानतळ परिसरात १२ तास गस्त सुरू केली आहे.
महापालिकेने घंटागाड्या दुप्पट केल्या असून आता अतिक्रमण देखील काढले जाणार आहे.विमानतळाच्या भिंतीलगत अतिक्रमण करून अनेकांनी घरे बांधली आहेत. त्यांच्याकडून शिळे अन्न व मांसाचे तुकडे भिंतीच्या आत टाकले जातात. त्यामुळे विमानतळ परिसरात भटकी कुत्री, मांजर व घारी (पक्षी) त्याठिकाणी येतात. याशिवाय भिंतीला भगदाड पाडून, तारेचे कंपाऊंड तोडून तरुण आतमध्ये येऊन पतंग उडवतात. याचा विमानसेवेला मोठा धोका असल्याने विमानतळ अधिकाऱ्यांनी पोलिस व महापालिका अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला आहे. गोवा, मुंबईनंतर आता सोलापुरातून बंगळुरू व बेळगाव या मार्गावरही विमानसेवा सुरू होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड