
पुणे, 10 नोव्हेंबर (हिं.स.)।
राज्यात आतापर्यंत सुमारे आठ लाख हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड झाली असून, ज्वारीची पेरणी सरासरी क्षेत्राच्या २६ टक्क्यांपर्यंत झाली आहे, तर गव्हाची पेरणी केवळ तीन टक्के झाली आहे. सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता चांगली असल्याने गहू, हरभरा आणि मक्याचे क्षेत्र वाढेल. या हंगामासाठी सरासरी क्षेत्राच्या किमान आठ लाख हेक्टर क्षेत्रावर अधिक पिकांची लागवड होईल, असा अंदाज आहे, अशी माहिती कृषी संचालक रफीक नाईकवडी यांनी दिली.
राज्यात ५७ लाख ८० हजार हेक्टरवर रब्बी पिकांची लागवड केली जाते. त्यापैकी सर्वाधिक २५ लाख १६ हजार हेक्टर क्षेत्र एकट्या हरभरा पिकाचे आहे. त्यानंतर रब्बी ज्वारीचे क्षेत्र १४ लाख ९५ हजार हेक्टर इतके आहे, तर गव्हाखालील क्षेत्र ११ लाख ८० हजार हेक्टर आहे. राज्यात यंदा अतिवृष्टीमुळे विहिरी, तलाव, धरणे यांत पाण्याची उपलब्धता तुडुंब असल्याने क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. त्याबाबत कृषी विभागाचे विस्तार संचालक रफीक नाईकवडी म्हणाले, राज्यात सरासरी ५७ लाख ८० हजार हेक्टरवर रब्बी पिकांची पेरणी होत असली तरी यंदा पाण्याची उपलब्धता चांगली आहे. त्यामुळे हे क्षेत्र ६५ लाख हेक्टरपर्यंत जाईल, अशी अपेक्षा आहे. यासाठी अकरा लाख टन सरासरी बियाण्यांची गरज असते; प्रत्यक्षात १४ लाख टन बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे. खतांची सरासरी आवश्यकता २५ लाख टन असते आणि यंदा ३१ लाख टन खते उपलब्ध करून दिली जाणार आहेत. क्षेत्र वाढ ही मुख्यत्वे गहू, हरभरा आणि मका या पिकांत होण्याची शक्यता आहे. पाण्याची उपलब्धता असल्याने गव्हाच्या क्षेत्रात वाढ होईल. हरभरा पिकातही वाढ अपेक्षित असून, चांगल्या आर्थिक परताव्यामुळे हरभऱ्याच्या क्षेत्रातही वाढ होण्याचा अंदाज आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु