रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे अंडर-19 क्रिकेट स्पर्धेला उत्साहात सुरुवात
रायगड, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन (आरडीसीए) तर्फे आयोजित एकोणीस वर्षाखालील मुलांच्या ४० षटकांच्या निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेला काल जिल्ह्यातील विविध मैदानांवर उत्साहात सुरुवात झाली. खारघर येथील घरत क्रिकेट मैदानावर झालेल
Raigad District Cricket Association kicks off Under-19 cricket tournament with enthusiasm


रायगड, 10 नोव्हेंबर (हिं.स.)।

रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन (आरडीसीए) तर्फे आयोजित एकोणीस वर्षाखालील मुलांच्या ४० षटकांच्या निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेला काल जिल्ह्यातील विविध मैदानांवर उत्साहात सुरुवात झाली. खारघर येथील घरत क्रिकेट मैदानावर झालेल्या उद्घाटन सोहळ्यात आरडीसीएचे उपाध्यक्ष राजेश पाटील यांच्या शुभहस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन सामन्यात एसबीसी महाड विरुद्ध चॅम्पियन्स क्रिकेट अकॅडमी खारघर हे दोन संघ आमनेसामने आले.

या स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्यातील अनेक मैदानांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये बी.पी. पाटील मैदान (खारघर), घरत मैदान, फोर्टी प्लस गावदेवी मैदान (टेंभोडे, पनवेल), छत्रपती शिवाजी महाराज मैदान (उलवे) आणि छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण (पेण) या ठिकाणांचा समावेश आहे. जिल्ह्यातील नामवंत क्रिकेट क्लब आणि अकॅडमींच्या संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. स्पर्धा साखळी पद्धतीने खेळवली जाणार असून त्यानंतर बाद फेरी खेळवली जाईल. या स्पर्धेमधील खेळाडूंच्या कामगिरीच्या आधारे रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा अधिकृत संघ निवडण्यात येणार आहे. हा संघ पुढे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन तर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या आंतरजिल्हा निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत रायगडचे प्रतिनिधित्व करणार आहे.

या स्पर्धेच्या आयोजनात रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सचिव प्रदीप नाईक, तसेच सर्व पदाधिकारी व सदस्य यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांनी सर्व संघांना आणि खेळाडूंना यशस्वी कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या. रायगड जिल्ह्यातील क्रिकेटपटूंना राज्यपातळीवरील व्यासपीठ मिळावे, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande