
रत्नागिरी, 10 नोव्हेंबर, (हिं. स.) : अधिवक्ता परिषद, कोकण प्रांत, रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा कार्यकारिणी व प्रत्येक तालुक्यातील तालुका कार्यकारिणीची घोषणा रविवारी रत्नागिरी जिल्हा न्यायालयातील हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात करण्यात आली.
याप्रसंगी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अॅंड गोवाचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य अधिवक्ता पारिजात पांडे, गोवा येथील ज्येष्ठ अधिवक्ता प्रवीण फळदेसाई, प्रांत कार्यकारिणी उपाध्यक्ष (आऊटरिच आयाम) व रत्नागिरी जिल्हा पालक (समन्वयक) सदस्य अधिवक्ता अभिषेक गोगटे, प्रांत कार्यकारिणी उपाध्यक्षा अधिवक्ता प्रिया लोवलेकर व प्रांत कार्यकारिणी आऊटरिच मंत्री रेखाताई कांबळे, रा. स्व. संघाचे जिल्हा कार्यवाह गजानन करमरकर उपस्थित होते.
याप्रसंगी मान्यवर आणि रायगड जिल्हाध्यक्ष संतोष पवार व प्रांत संघटनमंत्री श्रीराम ठोसर यांचा रत्नागिरी जिल्हा शाखेतर्फे शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात मावळते रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अधिवक्ता भाऊ शेट्ये यांनी फेब्रुवारी सन २०१७ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात सुरू झालेल्या अधिवक्ता परिषदेच्या कार्याला आता सर्वांच्या सहकार्याने चांगली गती मिळाली असल्याचा आनंद व्यक्त केला. रायगड जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी रायगड जिल्ह्यामधील कार्याचा धावता आलेख मांडला. परिषदेची मातृसंस्था असलेल्या, रा. स्व. संघाचे रत्नागिरी जिल्हा संघकार्यवाह गजानन करमरकर यांनी संघटना बांधणीतील अनुभवाचे बोल सांगून शुभेच्छा दिल्या. रत्नागिरी जिल्हा पालक, प्रांत उपाध्यक्ष अभिषेक गोगटे यांनी समन्वयक या भूमिकेतून सतत रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी व कार्यकर्ते यांच्याशी संपर्कात राहण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी प्रवीण फळदेसाई यांनी अधिवक्ता परिषद ही वकिलांची सर्वात मोठी, राष्ट्रीय स्तरावर कार्यात असलेली संघटना असून राष्ट्र सर्वो परी या विचारधारेला मानणारी असल्याचे सांगितले. समाजातील शेवटच्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे, ही भावना एकत्रितपणे जपण्याचे काम आपली संघटना करते, स्वभाषा ही न्यायालयाची भाषा असावी आणि वेगवेगळ्या निकालपत्रांमध्ये जसे लॅटिन, ग्रीक प्रोव्हर्ब दिसून येतात तसंच संस्कृत सुभाषिते व पंचतंत्रामधील मार्गदर्शक तत्त्वे यांचा संदर्भ येण्यासाठी वकिलांनी जाणीवपूर्वक अभ्यास करून त्याचा वापर न्यायालयीन कामात आणल्यास आपली संस्कृती व मूल्येसुद्धा समोर येतील, असा मोलाचा मुद्दा त्यांनी मांडला.
श्रीमती रेखाताई कांबळे आणि श्रीराम ठोसर व अभिषेक गोगटे यांनी सर्व तालुका कार्यकारिणी व जिल्हा कार्यकारिणीमधील पदाधिकारी व सदस्य यांची घोषणा केली. उपस्थित पदाधिकारी व सदस्य यांचे मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले.
ज्येष्ठ अधिवक्ता पारिजात पांडे यांनी समारोप करताना कार्यकारिणीमधील वरिष्ठांनी समईच्या ज्योतीप्रमाणे, सातत्याने तेवत राहून अखंड मार्गदर्शन करावे व तरुण कार्यकर्त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली धगधगत्या उत्साहात कार्य पुढे चालू ठेवावे, असे सांगितले. पूर्वीच्या युद्धामध्ये मायावी युद्धाद्वारे राक्षस युद्ध जिंकण्याचा प्रयत्न करत होते. आता राक्षसांचा प्रकार व युद्धपद्धती बदलली आहे, आता जाणीवपूर्वक फेक नॅरेटिव्ह समाजात पेरण्याचे काम चालू आहे, ते सजग होऊन ओळखून त्याला सडेतोड उत्तरे आपण शोधून मांडली पाहिजेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. यासाठी परिषदेने सर्वार्थाने अधिक सुदृढ होणे गरजेचे आहे व त्यासाठी आमचे पूर्ण सहकार्य असेल, असेही त्यांनी सांगितले.
मावळते जिल्हाध्यक्ष भाऊ शेट्ये यांनी नवीन जिल्हाध्यक्ष एम. एम. जैन यांना शाल पांघरून जिल्हाध्यक्षाची सूत्रे सोपवली. त्यानंतर अधिवक्ता जैन यांनी आभार मानले. सूत्रसंचालन अधिवक्ता व्ही. एस. गद्रे यांनी केले. सौ. श्वेता जोगळेकर यांच्या सुरेल आवाजातील संपूर्ण वंदे मातरमने कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाला जिल्हा कार्यकारिणीचे पालक सदस्य म्हणून निवृत्त न्यायाधीश श्री. जामखेडकर, ज्येष्ठ अधिवक्ता विलास पाटणे उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी