रत्नागिरी : कऱ्हाडे ब्राह्मण संघात शोभाताई नाखरे यांचे सकारात्मकतेवरील भाषण प्रेरणादायी
रत्नागिरी, 10 नोव्हेंबर, (हिं. स.) : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या विशेष पुरस्कारांचे वितरण रविवारी, दि. ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षिका शोभाताई नाखरे यांच्या हस्ते झाले. यावेळी शोभाताईंनी संकल्प सकारात्मकतेचा य
कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे पुरस्कार वितरण


रत्नागिरी, 10 नोव्हेंबर, (हिं. स.) : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्या विशेष पुरस्कारांचे वितरण रविवारी, दि. ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षिका शोभाताई नाखरे यांच्या हस्ते झाले. यावेळी शोभाताईंनी संकल्प सकारात्मकतेचा यावर दिलेले भाषण प्रेरणादायी ठरले.

राणी लक्ष्मीबाई सभागृहात हा कार्यक्रम झाला. सौ. शोभाताईंनी सकारात्मक वृत्तीच्या अनेक उदाहरणांतून आपण कसे सकारात्मक जगले पाहिजे, याविषयी विस्तृत विवेचन केले. शोभाताई म्हणाल्या की, माणसाची लहानपणापासूनच नकारात्मक बोलण्याची वृत्ती असते. पण आपण समाजात समाजभान दिसले की चांगुलपणाचा गुणाकार केला पाहिजे. भौतिक सुखाच्या मागे लागू नये. मन सकारात्मक असेल तर आपण असंख्य चांगल्या गोष्टी समाजात घडवू शकतो. ध्येय पक्के असले पाहिजे आणि छोट्या छोट्या गोष्टीतून सकारात्मकता अंगीकारली पाहिजे.

वयाच्या ८७ व्या वर्षी बीए झालेल्या चटर्जी आजी, दुर्धर आजारावर मात करत फोटोग्राफीत नाव कमावणारा रत्नागिरीचा अक्षय तथा अक्की परांजपे, माउंटन मॅन म्हणजे हातोडी, छिन्नीच्या साहाय्याने २२ वर्षे डोंगरातून रस्ता खोदणारा दसरथ मांझी यांच्यासह दिव्यांगांच्या अनेक सकारात्मक कथाही सौ. नाखरे यांनी सांगितल्या.

कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर यांनी प्रास्ताविकामध्ये संघाच्या कामकाजाची माहिती दिली. तसेच शताब्दी सोहळा दिमाखात साजरा करण्यात येणार असल्याचे सांगितले. उपाध्यक्ष मानस देसाई यांनी आभार मानले.समर्थ भारत अभियानांतर्गत मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळविणारे प्रवीण जोशी आणि शारदापीठ शृंगेरी येथे झालेल्या संपूर्ण भगवद्गीता कंठस्थ परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या त्यांच्या भगिनी सौ. मीरा नाटेकर या दोघा भावंडांना विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पुणे ते अयोध्या १४०० किमी सायकलने यशस्वीरीत्या प्रवास करणाऱ्या डॉ. सौ. अश्विनी गणपत्ये यांच्यावतीने मुलगी व सासू-सासरे यांनी पुरस्कार स्वीकारला. पीएचडी मिळवल्याबद्दल डॉ. सौ. अश्विनी देवस्थळी व डॉ. पंकज घाटे यांना सन्मानित केले.

संघाच्या वसतिगृहाचा माजी विद्यार्थी असल्याने रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघाने केलेला सन्मान घरचाच असल्याचे डॉ. पंकज घाटे यांनी सांगितले. मनाचे श्लोक व सामाजिक संस्कारासाठी मी नेहमी उपलब्ध असल्याचे प्रवीण जोशी म्हणाले. तर करिअर कौन्सिलिंगसाठी मी मदत करेन, अशी ग्वाही डॉ. अश्विनी देवस्थळी यांनी दिली. डॉ. गणपत्ये यांचे मनोगत मुलीने वाचून दाखवले, सायकलवरून अयोध्यावारी व हा सन्मान प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद असल्याचे त्यांनी म्हटले.कार्यक्रमात मंचावर अध्यक्ष माधव हिर्लेकर, उपाध्यक्ष मानस देसाई, कार्यकारिणी सदस्य सौ. प्रतिभा प्रभुदेसाई, सौ. सुयोगा जठार, मिलिंद आठल्ये, दिलीप ढवळे, उमेश आंबर्डेकर, विवेक पुरोहित आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सौ. प्रभुदेसाई आणि सचिव सौ. शिल्पा पळसुलेदेसाई यांनी केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande