
सोलापूर, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। येत्या आठ दिवसात उर्वरित 500 रुपयांचे थकीत ऊस बील द्यावे, अन्यथा कारखान्यासमोर आंदोलन केले जाईल, असा इशारा सोलापूर जिल्हा ऊस दर समितीचे समन्वयक व रयत क्रांती शेतकरी संघटनेचे नेते दिपक भोसले यांनी दिला आहे.
विठ्ठल च्या थकीत ऊस दरासाठी ऊस दर समिती आक्रमक झाली आहे. ऊस दर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विठ्ठलचे अध्यक्ष आमदार अभिजीत पाटील यांची भेट घेवून विविध मागण्यांचे लेखी निवेदन दिले आहे.आमदार अभिजीत पाटील यांनी मागील ऊस गाळप हंगामात ( 2024-2025) विधानसभा निवडणुक तोंडावर असताना 3 हजार 500 ऊस दर देण्याचे जाहीर केले होते.
त्यामुळे पंढरपूर,माढा,सांगोला, करमाळा,मोहोळ या भागातील शेतकर्यांनी कारखान्याला ऊस दिला होता. नवीन ऊस गाळप हंगाम सुरु झाली तरी अद्याप जाहीर केलेले 500 रुपये ऊस उत्पादक शेतकर्यांना दिले नाहीत. आता पर्यंत सुमारे 3 हजार रुपये दिले आहेत. उर्वरित 500 रुपये शेतकऱ्यांना द्यावेत या मागणीसाठी ऊस दर समितीने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड