
सात महिन्यांनंतरही सुसाईड नोटचं गूढ कायम
सोलापूर, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येला १८ नोव्हेंबरला सात महिने पूर्ण होतील. अजूनही डॉ. शिरीष यांच्या खिशातील सुसाईड नोटवरील अक्षर कोणाचे?, याचे ठोस उत्तर मिळालेले नाही. वैज्ञानिक प्रयोगशाळेचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही आहे. संशयित आरोपी मनीषा मुसळे मानेंनी आपण निर्दोष असल्याचे सांगत वकिलामार्फत दोषमुक्तीचा अर्ज केला आहे.
या पार्श्वभूमीवर त्यांच्या वकिलांनी सात जणांचे पाच महिन्यांचे सीडीआर व टॉवर लोकेशन जतन करून ठेवावे किंवा न्यायालयात सादर करावे, असा अर्ज न्यायालयाकडे केला आहे. त्यावर २१ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे. डॉ. शिरीष यांच्या आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी मनीषा या डॉक्टरांच्या रुग्णालयात २००८ पासून प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करत होत्या. त्यांनी अधिकार व पगार कापल्याने स्वत:च्या मुलांना मारुन मी देखील रुग्णालयासमोर पेटवून घेऊन आत्महत्या करेन, असा ई-मेल डॉक्टरांना केला होता. त्या पत्रामुळे नैराश्यातून डॉ. शिरीष यांनी आत्महत्या केली, अशी फिर्याद डॉ. अश्विन वळसंगकर यांनी सदर बझार पोलिसांत दिली. तत्पूर्वी, डॉक्टरांच्या पॅन्टच्या खिशामध्ये सुसाईड नोट मिळाली होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड