
सोलापूर, 10 नोव्हेंबर (हिं.स.)।
महापालिकेत महत्त्वाच्या विविध विभागात भरतीसाठी निवृत्त कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. पेन्शन इतकेच मानधन या कर्मचाऱ्यांना देऊन नियुक्ती केली जाणार आहे. अधिकाऱ्यांशी लागेबांधे असल्यानेच या निवृत्त कर्मचाऱ्यांना सामान्य प्रशासन विभागाकडून पुन्हा संधी दिली जात असून या नियुक्त्यांमुळे पुन्हा तीच माणसे खुर्चीवर ठिय्या मांडून बसणार असल्याचा आरोप होऊ लागला आहे.महापालिकेतील कायम कर्मचाऱ्यांची कामाची कमी असणारी गती अन् तज्ज्ञ असल्याच्या नावाखाली निवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा मानधनावर नियुक्त करण्याचा सपाटा महापालिकेने लावला आहे. एकीकडे नियमित काम करणाऱ्या मानधनावरील युवकांना पैसे नसल्याने तीन महिन्यांतून एकदा वेतन दिले जाते. तर दुसरीकडे पेन्शन इतकेच मानधन देऊन निवृत्त कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी मुलाखती घेण्यात आल्या आहेत. महापालिकेत नगररचना, भांडार कार्यालय, अतिक्रमण आणि पाणीपुरवठा यासह इतर विभागात निवृत्त अधिकाऱ्यांच्या मानधनावर नियुक्तीसाठी मुलाखती घेण्यात आल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड