
रायगड, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। गालसुरे विभागातील २० गावांच्या संयुक्त पुढाकारातून उभारण्यात आलेले कुणबी समाज सभागृह शनिवारी (९ नोव्हेंबर) मंत्री आदिती तटकरे यांच्या शुभहस्ते उत्साहात व भव्यतेने उद्घाटन करण्यात आले. समाजातील एकता, प्रगती आणि आत्मसन्मानाचा नवा दीप या सोहळ्याने प्रज्वलित झाला.
या ऐतिहासिक कार्यक्रमाला तालुक्यातील विविध गावांतील समाजबांधव, पदाधिकारी, शासकीय अधिकारी, मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटनानंतर बोलताना आमदार आदिती तटकरे म्हणाल्या, “जात-धर्म न पाहता सर्वांना समान संधी देणे हेच आमचे ध्येय आहे. हे सभागृह केवळ एक इमारत नसून समाजाच्या आत्मसन्मानाचे प्रतीक आहे.
तटकरे यांनी पुढे सांगितले की, या सभागृहाच्या माध्यमातून समाजाच्या शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक प्रगतीस चालना मिळेल. सभागृहाला ग. स. कातकर साहेब यांचे नाव देऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी तालुक्यातील भातशेतीच्या नुकसानीबाबत चिंता व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचे निर्देश दिले.
कार्यक्रमाचे आयोजन कुणबी समाज सामाजिक संस्था, गालसुरे विभाग यांनी शिस्तबद्ध व उत्साहपूर्ण पद्धतीने केले. परिसरात एकात्मता, आनंद आणि प्रगतीचा माहोल अनुभवास आला. या भव्य उद्घाटनाने गालसुरे विभागात समाज ऐक्याचा आणि विकासाचा नवा अध्याय सुरू झाल्याचा एकमुखी सूर उपस्थितांनी व्यक्त केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके