
पुणे, 10 नोव्हेंबर (हिं.स.)। राज्यातील महिलांमध्ये कर्करोगाचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, राज्य सरकारच्या व्यापक तपासणी मोहिमेतून धक्कादायक आकडे समोर आले आहेत. ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या मोहिमेअंतर्गत घेण्यात आलेल्या तपासणी शिबिरांमध्ये तब्बल एक कोटी ५१ लाख महिलांची तपासणी करण्यात आली, ज्यात हजारो महिला कर्करोगाच्या विळख्यात सापडल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
राज्यात महिलांच्या आरोग्यासाठी राबविलेल्या ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ मोहिमेतून चिंताजनक वास्तव उघड झाले आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, तपासणी झालेल्या महिलांपैकी १७ हजार ६१८ महिलांना मुख कर्करोगाचा संशय, तर ४५० महिलांना स्तनाचा कर्करोग असल्याचे निदान झाले आहे. विशेष म्हणजे नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक संशयित रुग्ण आढळले असून, राज्यातील एकंदर आरोग्य स्थितीबाबत चिंता व्यक्त करायला लावणारी ही आकडेवारी आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु