राजापूर लांजा तालुका नागरिक संघाची आगळीवेगळी दिवाळी अंक स्पर्धा
रत्नागिरी, 10 नोव्हेंबर, (हिं. स.) : राजापूर लांजा तालुका नागरिक संघाने आगळीवेगळी दिवाळी अंक स्पर्धा आयोजित केली आहे. त्यासाठी अंक पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दिवाळी अंक ही मराठी साहित्यातील एक परंपरा आहे. दिवाळीच्या आनंददायी पर्वात दिवाळी
दिवा्ळी अंकांचे वाचक


रत्नागिरी, 10 नोव्हेंबर, (हिं. स.) : राजापूर लांजा तालुका नागरिक संघाने आगळीवेगळी दिवाळी अंक स्पर्धा आयोजित केली आहे. त्यासाठी अंक पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दिवाळी अंक ही मराठी साहित्यातील एक परंपरा आहे. दिवाळीच्या आनंददायी पर्वात दिवाळी अंकाची निर्मिती करून मराठी भाषेतील विविध साहित्य दिवाळीच्या फराळाबरोबरचा एक अविभाज्य भाग म्हणून गेली शंभराहून अधिक वर्ष मराठी घराघरात पोहोचत आली आहे. दिवाळी अंक हे मराठीचे वैभव असले, तरी शाळा-कॉलेजात मराठीपेक्षा इंग्रजीलाच जास्त प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे सामान्य माणसाला मराठीतून व्यवहार करणे कमीपणाचे वाटू लागले आहे. गावखेड्यात वावरणाऱ्या कार्यकर्त्यांनाही मराठी भाषेच्या दयनीय अवस्थेने चिंतेत टाकले आहे. गावखेड्यात दूरदूरपर्यंत वर्तमानपत्र कसे असते हे ठाऊक नाही. अवांतर वाचनासाठी वाचनालये नाहीत. पुस्तकाचे दुकान तर नाहीच नाही. अशा ठिकाणी दिवाळी अंक पोहोचविण्यासाठी राजापूर लांजा तालुका नागरिक संघाने एक उपक्रम आयोजित केला आहे. स्पर्धेनंतर हे दिवाळी अंक गावखेड्यांपर्यंत पोहोचवून वाचक वाढविण्याचा हा उपक्रम आहे.

राजापूर लांजा तालुका नागरिक संघ ही संस्था पंचाहत्तरीकडे वाटचाल करणारी संस्था आहे. या संस्थेमार्फत गेली अकरा वर्षे ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन ग्रामीण भागात केले जाते. नवोदित साहित्यिकांना व्यासपीठ मिळावे म्हणून केलेला हा प्रयत्न यशस्वी ठरत आहे.

या साहित्य संमेलनात पुस्तक प्रदर्शनाचे स्टॉल असतात. तसेच एक प्रदर्शन दिवाळी अंकांचे ठेवले तर वाचकांना महाराष्ट्रात प्रसिद्ध होणाऱ्या दिवाळी अंकांची नावे कळतील तसेच आपण कोणता दिवाळी अंक मागवावा, वाचावा हे ठरवता येईल. हे करत असताना आलेल्या दिवाळी अंकांच्या परीक्षणातून पहिले तीन क्रमांक आणि उत्तेजनार्थ बक्षिसे दिली जाणार आहेत. अनुक्रमे २५००, २०००, आणि १५०० रुपयांची पारितोषिके दिली जातील. प्रदर्शन संपल्यानंतर सर्व अंक जवळच्या वाचनालयात ठेवले जातील.

ग्रामीण भागात दिवाळी अंकांची वाचक चळवळ उभारणीसाठी दिवाळी अंकांचे प्रकाशक-संपादकांनी दिवाळी अंकाच्या दोन प्रती २५ नोव्हेंबर २०२५ पर्यंत गौतम जाधव, मु. पो. कोंडगे, ता. लांजा, जि.रत्नागिरी-४१५६४३ या पत्त्यावर पाठवाव्यात. अधिक माहिती ग्रंथपाल श्री. जाधव यांच्याशी ९४०५३२६८१० या क्रमांकावर संपर्क साधल्यास मिळू शकेल, असे कळविण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande