
नाशिक, 11 नोव्हेंबर (हिं.स.)।मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी ( दि.१३ ) रोजी नूतन जिल्हा परिषद इमारतीचे लोकार्पण तसेच सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर मंजूर विविध विकास प्रकल्पांचे भूमिपूजन होणार आहे. या संदर्भातील माहिती भारतीय जनता पक्षाच्या शहर कार्यालय ‘वसंतस्मृती’ येथे आयोजित नियोजन बैठकीत कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी माहिती दिली.
बैठकीस मंत्री गिरीश महाजन, आ. सीमाताई हिरे, आ. देवयानी फरांदे, आ. राहुल ढिकले, भाजप महानगर अध्यक्ष सुनील केदार, मा. आ. बाळासाहेब सानप, मा. आ. अपूर्व हिरे, ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी उपस्थित होते.बैठकीत नाशिक शहरातील आगामी कुंभमेळा आयोजनाच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या विविध विकासकामांवर सविस्तर चर्चा झाली. स्थानिक आमदार व पदाधिकाऱ्यांनी शहरातील प्रमुख रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण करण्याची आवश्यकता व्यक्त केली. त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून विशेष निधी उपलब्ध करून देण्याची सूचना यावेळी करण्यात आली.
कुंभमेळ्याच्या नियोजनाचा भाग म्हणून रामकालपथ, नाशिक–त्र्यंबक रस्ता रुंदीकरण, गोदावरी नदीवरील नव्या पूलाचे बांधकाम आणि इतर महत्त्वपूर्ण प्रकल्पांसाठी राज्य शासनाकडून भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कुंभमेळ्याच्या काळात उद्भवू शकणाऱ्या कायदा व सुव्यवस्था, वाहतूक व्यवस्थापन, स्वच्छता आणि सुरक्षा उपाययोजना या विषयांवरही सविस्तर चर्चा होणार असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.यावेळी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV