
नवी दिल्ली , 11 नोव्हेंबर (हिं.स.)।भुटानच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीमध्ये झालेल्या कार स्फोटाबद्दल दु:ख व्यक्त केले असून या घटनेसाठी जबाबदार असणाऱ्यांना कोणतीही सूट दिली जाणार नाही, असे स्पष्ट केले आहे. सोमवारी संध्याकाळी दिल्लीमध्ये बॉम्बस्फोट झाला आणि ठरलेल्या कार्यक्रमानुसार पंतप्रधान मोदी मंगळवारी सकाळी भुटानला पोहोचले. तिथेच त्यांनी या घटनेवर आपले वक्तव्य दिले.
थिम्फूमध्ये आयोजित एका कार्यक्रमात पंतप्रधान मोदी म्हणाले,“आज मी येथे अतिशय जड अंतःकरणाने आलो आहे. काल संध्याकाळी दिल्लीमध्ये घडलेल्या भीषण घटनेने सर्वांच्या मनाला वेदना दिल्या आहेत. मी पीडित कुटुंबियांच्या वेदना समजू शकतो. आज संपूर्ण देश त्यांच्या सोबत उभा आहे. मी काल रात्रीभर या घटनेच्या तपासात गुंतलेल्या सर्व संस्थांशी आणि संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्कात होतो. आमच्या तपास यंत्रणा या षड्यंत्राच्या मुळापर्यंत पोहोचतील. या स्फोटामागे असलेल्या षड्यंत्रकर्त्यांना अजिबात सोडले जाणार नाही.”सोमवारी संध्याकाळी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ एका कारमध्ये झालेल्या स्फोटात ११ लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी आहेत. तपास यंत्रणा या स्फोटाच्या चौकशीत व्यस्त आहेत. प्राथमिक तपासात असे उघड झाले आहे की स्फोटासाठी अमोनियम नायट्रेटचा वापर करण्यात आला होता.
यापूर्वी फरीदाबादमध्ये तपास संस्थांनी एका दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला होता आणि सुमारे तीन क्विंटल अमोनियम नायट्रेट जप्त केले होते. तपास यंत्रणांना संशय आहे की दिल्लीतील या स्फोटाचे धागेदोरे फरीदाबादच्या त्या दहशतवादी मॉड्यूलशी जोडलेले असू शकतात.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode