
श्री गुरु तेग बहादुर (एप्रिल 1621 – नोव्हेंबर 1675) हे शीख धर्माचे नववे गुरु होते. त्यांचा जन्म अमृतसर (पंजाब) येथे झाला. श्री गुरू तेग बहादुर यांनी आपल्या आयुष्यात अन्याय, धार्मिक असहिष्णुता आणि अत्याचाराविरोधात लढा दिला. म्हणूनच त्यांना ‘हिंद दी चादर’ या नावाने गौरविले जात. धर्म, मानवता, आदर्श आणि तत्त्वांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्यांमध्ये गुरु तेग बहादुर यांचे स्थान जागतिक इतिहासात अद्वितीय आहे. श्री गुरु तेग बहादुर हे जगभर प्रभाव टाकणारे महान गुरु मानले जातात. त्यांच्या शहिदी समागमाचा इतिहास सर्वदूर पोहोचावा यासाठी गुरू तेग बहादुर यांच्या ३५० व्या शहिदी समागमानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्यांक विभाग व श्री गुरूतेग बहादुर साहिब जी ३५० शहीदी समागम राज्यस्तरीय समितीच्या वतीने राज्यभर विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
एप्रिल १६२१ मध्ये अमृतसरमध्ये श्री गुरू तेग बहादूर यांचा जन्म वडील गुरू हरगोबिंद आणि माता गुजरी यांच्या कुटुंबात झाला. १६६४ मध्ये त्यांना गुरू ही पदवी प्राप्त झाली तर त्यांचे पुत्र गुरू गोविंदसिंह यांनाही गुरु पदवी प्राप्त झाली होती. गुरू तेग बहादूर यांचे मूळ नाव त्यागमल होते. बालपणी एका युद्धात त्यांनी अतुलनीय शौर्य दाखवले त्यावेळी त्यांच्या वडिलांनी त्यांना तेग बहादूर म्हणजेच तलवारीसारखा धैर्यवान हे नाव दिले. ते अतिशय शांत, ध्यानशील आणि संयमी स्वभावाचे होते. त्यांनी मोठे भाग्य, संपत्ती, मान नाकारत आनंदपूर साहिब येथे ध्यान आणि सेवा यांमध्ये आयुष्य व्यतीत केले. धार्मिक असहिष्णुता आणि अत्याचाराविरोधात लढा देत असताना त्यांना दिल्लीतील चांदणी चौकातील तुरूंगात ठेवण्यात आले होते. तेथे त्यांनी ध्यान करत, ईश्वराचे स्मरण करण्यास प्राधान्य दिले.
मानवधिकारांच्या सुरक्षेसाठी काम करीत असताना गुरूतेग बहादुर शहीद झाले. त्यांनी लोकांना सत्य, संयम, करूणा आणि धैर्य या मुल्यांचा संदेश दिला. त्यांची अनेक भक्तिगीते गुरू ग्रंथ साहिबमध्ये समाविष्ट आहेत. त्यांनी आनंदपूर साहिब हे पवित्र स्थळ स्थापन केले. जे आजही शीख धर्मातील अत्यंत महत्वाचे तीर्थस्थान मानले जाते. त्यांच्या बलिदानामुळे ते धार्मिक स्वातंत्र्याचे प्रतीक बनले होते. त्यांच्या स्मरणार्थ त्यांची जयंती देशभरात श्रद्धेने साजरी केली जाते. केंद्र शासनाने २०२२ मध्ये त्यांची ४०० वी जयंती देशभर साजरी केली होती.
त्यांनी देशाला साधे आणि गहन तत्वज्ञान दिले व सुमारे ५७ शबद (भक्तिगीते) आणि ५७ सलोक (उपदेशपर पदे) रचले. या रचनांमध्ये वैराग्य, सत्य, मृत्यूचे चिंतन, आत्मज्ञान आणि परमेश्वरावर श्रद्धा या भावना प्रबळ आहेत. त्यांच्या सर्व रचना गुरु ग्रंथ साहिबच्या शेवटच्या भागात आहेत.
‘जो नर दु:ख में दु:ख नहीं मानै,
सुख सनेहु अरू भय नहीं जा कै, कांचन माटी मानै,
लोभ मोह अभिमान न ता कै, हरख सोग नहीं जा कै
जो नर दु:ख में दु:ख नहीं मानै’
म्हणजेच जो मनुष्य दु:खात असला तरी दु:खी होत नाही, जो सुखात असला तरी अहंकार करत नाही, ज्याच्यासाठी सोने आणि माती समान आहेत, जो लोभ, मोह, अभिमान, आनंद आणि शोक यांपासून मुक्त आहे तोच खरा ज्ञानी आहे. अशा अनेक भावपूर्ण आणि मानवी जीवनाचा सार सांगणाऱ्या रचना त्यांनी केल्या आहेत.
त्यांच्या शहीद समागमास ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अल्पसंख्यांक विभाग आणि श्री गुरूतेग बहादुर साहिब जी ३५० शहीदी समागम राज्यस्तरीय समितीच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
नुकत्याच या कार्यक्रमांच्या आयोजनानिमित्त कार्यशाळा घेण्यात आली होती. यावेळी ‘हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादुर साहेब’ यांच्या ३५०व्या शहिदी समागमनिमित्त संकेतस्थळाचे आणि गुरु तेग बहादूर यांच्या बलिदानाचा इतिहास सांगणाऱ्या गीताचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यशाळेनिमित्त शीख, सिकलिगर, बंजारा, लबाना, मोहियाल, सिंधी हे सहा समाज एकत्र आले होते आणि हा कार्यक्रम जनमानसांपर्यंत पोहोचविण्यासाठी समिती आणि शासन एकत्रितरित्या काम करीत आहे. त्यांच्या बलिदानाचा इतिहास राज्यातील प्रत्येक घरात पोहोचविणे ही सामूहिक जबाबदारी आहे. तसेच, तहसील, शहर, जिल्हा व क्षेत्रीय समितीच्या माध्यमातून प्रत्येक गावात आणि घराघरात गुरू तेग बहादुरांच्या हौतात्म्याचा इतिहास पोहोचविला जाणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर