
जळगाव, 11 नोव्हेंबर (हिं.स.) | यावल तालुक्यातील किनगाव खुर्द गावातील पाण्याच्या टाकीखाली सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकत १५ जणांना रंगेहात पकडले. या कारवाईत पोलिसांनी जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा एकूण ३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून सर्वांविरुद्ध यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावल पोलिस ठाण्याचे निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथकाने तत्काळ कारवाई केली. पाण्याच्या टाकीखाली काही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळत असल्याची माहिती मिळताच पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तेथे दीपक भोई, शांताराम पाटील, सलीम मुसलमान, शेख जाबीर, शिवाजी पाटील, नितीन वराडे, शशिकांत पाटील, भागवत पाटील, अंकुश कोळी, सुभाष महाजन, साहेबराव साळुंखे, वासुदेव वराडे, रवींद्र पाटील, दिलीप वंजारी आणि सुनील पाटील हे १५ जण जुगार खेळताना आढळून आले.
पोलिसांनी तत्काळ छापा टाकून सर्वांना ताब्यात घेतले व त्यांच्या ताब्यातून जुगारासाठी वापरलेले साहित्य आणि रोख रक्कम असा एकूण ३,८०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. याप्रकरणी पोलिस हवालदार सचिन पाटील यांच्या फिर्यादीवरून १५ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर