
हिंगोली, 11 नोव्हेंबर (हिं.स.)। हिंगोली जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या वाचन संस्कृतीचा विकास करण्यासाठी वाचनालय व ग्रंथालय तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले आहेत. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात रुमची सुविधा असलेल्या पाच शाळांची यादी उपलब्ध करून द्यावी, असे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने सक्षम करण्यासाठी न्यास व एनसीईआरटी (NCERT) आधारित मराठी, गणित, विज्ञान व इंग्रजी विषयांवरील प्रश्नसंच तयार करण्यात यावेत. विद्यार्थ्यांचा पायाभूत शैक्षणिक विकास साधण्यासाठी पायलट प्रकल्प राबवावा, अध्ययन निश्चिती करावी, तसेच गणित, विज्ञान व भाषा विषयांमध्ये गुणवत्तावृद्धीसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षण विभागाच्या सुकाणू समितीची बैठक पार पडली. यावेळी शिक्षणाधिकारी आसावरी काळे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी सुनिल बारसे तसेच सुकाणू समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, शाळांमध्ये गुणवत्तावृद्धीसाठी भाषा समृद्धी अभियान व गणित समृद्धी अभियान प्रभावीपणे राबवावे. विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतेचा विकास, प्रश्नसंचाच्या सरावाद्वारे संकल्पनात्मक आकलन वाढविणे, तसेच शिक्षकांच्या अध्यापन पद्धतीत नवकल्पना आणणे यावर विशेष भर द्यावा.या बैठकीत शिक्षण विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेऊन जिल्ह्यातील शैक्षणिक गुणवत्तेच्या उन्नतीसाठी ठोस कृती आराखडा तयार करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
------------------
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis