
परभणी, 11 नोव्हेंबर (हिं.स.)।पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीतील सत्तांतराच्या हालचालींना आज अखेर यश आले. सभापती अनिल नखाते यांच्याविरोधात दाखल झालेला अविश्वास ठराव पारित झाला असून ५ विरुद्ध १३ अशा मतांनी हा ठराव मंजूर करण्यात आला. त्यामुळे नखाते यांना सभापती पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.
शिवसेनेच्या काही संचालकांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष आ. बाबाजानी दुर्राणी यांच्याशी हातमिळवणी केल्यानंतर ही राजकीय उलथापालथ घडली. नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर झालेली ही घटना शिवसेना नेते सईद खान आणि राष्ट्रवादीचे आमदार राजेश विटेकर यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
अविश्वास ठरावाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनावश्यक अनुशासनभंग होऊ नये म्हणून पाथरी पोलिसांनी बाजार समिती परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता. शहराला अक्षरशः छावणीचे स्वरूप आले होते. राजकीय विश्लेषकांच्या मते, आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या दृष्टीने ही घडामोड काँग्रेससाठी बळकटी ठरू शकते.
सर्व आरोप चुकीचे, सहानुभूती मिळणार – अनिलराव नखाते
“माझ्याविरोधात केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. आज मला सभापती पद सोडावे लागले असले तरी लोकांची सहानुभूती माझ्यासोबत आहे. आगामी सर्व निवडणुकांमध्ये याचा नक्कीच परिणाम दिसून येईल,” अशी प्रतिक्रिया माजी सभापती अनिलराव नखाते यांनी दिली.
आम्ही सर्व संचालक आजही शिवसेनेतच – पप्पू घाडगे
“राजकीय समीकरणामुळे आम्ही काँग्रेससोबत गेलो असलो, तरी आमची विचारधारा शिवसेनेचीच आहे. आम्ही सर्व संचालक आजही शिवसेनेतच आहोत,” असे संचालक पप्पू घाडगे यांनी स्पष्ट केले.
दुर्राणी यांच्या नेतृत्वाखाली पुढील रणनीती
अविश्वास ठरावानंतर सर्व १३ संचालकांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष आ. बाबाजानी दुर्राणी यांच्यासोबत गार्डन हाऊस येथे एकत्र येऊन भोजनाचा आनंद घेत आगामी सभापती निवडीसंदर्भात चर्चा केली. या बैठकीनंतर दुर्राणी हेच या घडामोडींचे मुख्य सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाले असून त्यांनी सईद खान आणि आमदार राजेश विटेकर यांना राजकीय शह दिला, असे बोलले जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis