
सोलापूर, 11 नोव्हेंबर, (हिं.स.)। महापालिका प्रशासन आणि शहर पोलिस आयुक्त कार्यालय या दोन शासकीय खात्यांचा वाद सोमवारी चव्हाट्यावर आला. पोलिस प्रशासनाकडे आठ लाखांची पाणीपट्टीची थकबाकी असल्याची नोटीस महापालिका प्रशासनाकडून पाठवण्यात आली. त्यावर त्वरेने हालचाली करत महापालिकेच्या अतिक्रमण विभागास मदतीसाठी दिलेल्या बंदोबस्ताचे 66 लाखांची प्रलंबित रक्कम अदा करावी, असे पत्र पोलिस प्रशासनाने महापालिकेस पाठवले.
महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने मोहीम हाती घेतल्यास त्यास अतिक्रमण धारकांचा मोठ्याप्रमाणावर विरोध होतो. त्यामुळे पालिस आयुक्त कार्यालयाकडून पोलिस बंदोबस्त घेण्यात येतो. पालिस आयुक्त कार्यालयाकडून एक उपनिरीक्षक, पाच कॉन्स्टेबल आणि दोन महिला पोलिस कर्मचार्यांची नियुक्ती महापालिकेच्या अतिक्रमण विभागात करण्यात आली आहे. या पोलिस कर्मचार्यांच्या पगारापोटी महापालिका महिन्याकाठी साधारणतः पाच ते सहा लाख रूपये पोलिस आयुक्तालयात जमा करते. मात्र गेल्या अनेक वर्षापासून अतिक्रमण कालावधित वापरलेल्या पोलिस बंदोबस्ताचे पगाराचे बिल महापालिकेने पोलिस प्रशासनास अदा केले नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड