बालक म्हणजेच भविष्यातील समाजाचे शिल्पकार
१४ नोव्हेंबर हा दिवस भारतात ‘बालदिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे विशेष महत्त्व असे की हा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जयंती दिवस आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंना बालकांविषयी अपार प्रेम होते. त्यांच्या हृदयात मुलांप्रती जिव्
बालदिन


१४ नोव्हेंबर हा दिवस भारतात ‘बालदिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे विशेष महत्त्व असे की हा भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जयंती दिवस आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंना बालकांविषयी अपार प्रेम होते. त्यांच्या हृदयात मुलांप्रती जिव्हाळा, स्नेह आणि करुणा होती. ते म्हणत, “आजची मुले उद्याचा भारत घडवतील. त्यांच्यावर देशाचे भविष्य अवलंबून आहे.” खरंच, एक समाज, एक राष्ट्र अथवा एक संस्कृती किती प्रगत, संवेदनशील आणि सुजाण होईल याचा पाया त्याच्या बालकांच्या संगोपनात दडलेला असतो. ‘बालक म्हणजेच भविष्यातील समाजाचे शिल्पकार’ हा विचार केवळ एक घोष नव्हे तर एका संपन्न, न्याय्य, प्रगतिशील आणि मानवतावादी समाजव्यवस्थेची मुळाक्षरे आहे. मानव समाजाचे अस्तित्व चालू ठेवणारा, त्यात बदल, विकास आणि सुधारणांची बीजांकुरे पेरणारा घटक म्हणजे ‘बालक’ होय. त्यामुळे बालकांचे संगोपन, संरक्षण, शिक्षण आणि व्यक्तित्वविकास ही समाजाची केवळ नैतिक जबाबदारी नाही तर अस्तित्वाची गरज आहे.

बालक हा जन्मतः निष्पाप, कोवळा, कोरा आणि जगाविषयी उत्सुकतेने भरलेला असतो. हा कोरा कागद समाज, कुटुंब, शाळा, सांस्कृतिक संस्था, माध्यमे आणि आजूबाजूच्या परिस्थितीच्या स्पर्शाने आकार घेतो. समाजशास्त्रीय दृष्टीने पाहता बालक समाजिकीकरणाच्या प्रक्रियेतून ‘माणूस’ म्हणून घडतो. या समाजिकीकरणाच्या प्रवासात बालकाला जे मूल्य, नैतिकता, संस्कार, दृष्टीकोन आणि जीवनपद्धती देण्यात येते तीच पुढील पिढीचा कणा बनते. त्यामुळे बालकांचे संगोपन हा वैयक्तिक नाही तर सामाजिक गुंतवणुकीचा भाग आहे. ज्या समाजात बालकांना सुरक्षित वातावरण, प्रेम, शिक्षण आणि संधी उपलब्ध होते तो समाज पुढे जाऊन विकासशील आणि समतामूलक होतो. उलट, ज्या समाजात बालकांना दुर्लक्षित, शोषित आणि उपेक्षित ठेवलं जातं तिथे असमानता, हिंसा, अन्याय आणि अत्याचार वाढतो.

भारतीय समाजरचनेत बालकांची स्थिती पाहिली तर एक चित्र आशादायी तर दुसऱ्या बाजूला चिंताजनक आहे. एकीकडे मुलांचे हक्क, शिक्षण आणि संरक्षण यासाठी कायदे, धोरणे आणि शासकीय योजना अस्तित्वात आहेत. 'मुलांकरिता मोफत व सक्तीचे शिक्षण अधिकार अधिनियम २००९', ‘बालकांचे संरक्षण (POCSO) कायदा’, ‘बालकल्याण समित्या’, ‘अंगणवाडी योजने’पासून ‘बाल आरोग्य राष्ट्रीय कार्यक्रमां’पर्यंत अनेक उपक्रम राबवले जात आहेत. परंतु वास्तवात अजूनही शिक्षणाऐवजी मजुरी करणारी मुले, रस्त्यावर भटकणारी निराधार मुले, कुपोषणाची झळ सोसणारी बालके, तस्करी आणि अत्याचारांची बळी पडणारी मुले, सामाजिक-आर्थिक विषमतेमुळे शाळेबाहेर पडणारी मुले हा कटू अनुभव आपल्या समाजात दिसतो. समाज कितीही प्रगत झाल्याचे उदाहरण दिले तरी बालकांच्या चेहऱ्यावरची असुरक्षितता, भीती, उपासमार किंवा असमान संधींची वेदना समाजाच्या अंतरात्म्याला खणखणीत प्रश्न विचारते.

बालकांना सुरक्षित आणि पोषक वातावरण देण्यासाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे ‘कुटुंब’ होय. कुटुंब ही बालकाची पहिली शाळा आणि आई-वडील हे पहिले शिक्षक आहेत. पण पाहिलं तर आधुनिक काळात कुटुंबसंस्था मोठ्या प्रमाणात बदलत चालली आहे. आर्थिक ताण, स्थलांतर, संधींची स्पर्धा, माहिती तंत्रज्ञानाचा प्रभाव, कुटुंबातील संवादाचा अभाव, पालकांचे व्यसनाधीन आणि मानसिक तणावग्रस्त होणे यामुळे बालकांवर गंभीर परिणाम दिसतो. मुलांच्या भावनिक गरजा पूर्ण होऊ शकत नाहीत तेव्हा बालक अंतर्मुख, अस्वस्थ, आक्रामक किंवा तुटक बनतो. समाजात आज वाढणारी हिंसक वर्तणूक, नैराश्य, आत्महत्या, अभ्यासाविषयीचा ताण, वर्तनातील बदल हे फक्त वैयक्तिक नव्हे तर सामाजिक संकेत आहेत. बालकांच्या मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे त्यांच्या भविष्यावर, आणि विस्ताराने देशाच्या भविष्यावर आघात आहे.

शाळा हा बालकांच्या विकासाचा दुसरा महत्त्वाचा स्तंभ होय. शाळा केवळ ज्ञान देण्याचे केंद्र नसून व्यक्तिमत्वविकास, मूल्यसंस्कार, सामाजिक जाण, नेतृत्वगुण, सहकार्य, सहिष्णुता आणि मानवी संवेदना विकसित करण्याचे स्थान आहे. शिक्षण हा केवळ गुण, परीक्षांचे निकाल, शिष्यवृत्ती किंवा प्रमाणपत्र यापुरता विषय नाही. शिक्षण म्हणजे जागृती, विवेक, विचारशक्ती, प्रश्न विचारण्याची क्षमता, निर्णयक्षमता आणि स्वतःचा स्वभाव ओळखण्याची प्रक्रिया. आज शिक्षण व्यवस्थेत अनेक सुधारणा होत आहेत, पण शिक्षणात ‘मानवता’ आणि ‘सहजतेला’ टिकवून ठेवणे ही खरी कसोटी आहे. शिक्षक हा केवळ अध्यापन करणारा व्यक्ती नसून बालकाच्या मनाचा शिल्पकार आहे. शिक्षकाच्या एका शब्दाने, एका स्पर्शाने, एका प्रोत्साहनाने बालकाचे आयुष्य आकार घेऊ शकते. म्हणून शिक्षक-विद्यार्थी नात्यातील मानवी स्पर्श टिकुन राहणे अत्यावश्यक आहे.

आजचे युग विज्ञान आणि माहिती-तंत्रज्ञानाचे आहे. मोबाइल, इंटरनेट आणि सामाजिक माध्यमे आज बालकांच्या हातात सहज उपलब्ध आहेत. यामुळे ज्ञानाचा अवकाश नक्कीच वाढला आहे. परंतु त्याचबरोबर भौतिकवादी, कृत्रिम, आभासी आणि बनावट मूल्यांचे जग देखील बालकाला ओढू लागले आहे. त्यामुळे बालकांना तंत्रज्ञानाचा सुजाण आणि संतुलित वापर शिकवणे ही वेळेची गरज आहे. नैतिकता, मूल्यसंस्कार, सहानुभूती, विनम्रपणा, संवादकौशल्य, निसर्गावरील प्रेम आणि मानवी जीवनाच्या मूळ भावनांची जपणूक करणे हे डिजिटल युगात अधिक महत्वाचे ठरते.

‘बालक म्हणजेच भविष्यातील समाजाचे शिल्पकार’ हा विचार तेव्हाच साकार होतो, जेव्हा बालकांना केवळ जिवंत राहण्याचा हक्क नव्हे, तर वाढण्याचा, स्वप्न पाहण्याचा, व्यक्त होण्याचा आणि माणूस म्हणून आदर मिळण्याचा हक्क दिला जातो. प्रत्येक बालक हे मूलतः संभाव्य प्रतिभेचे केंद्र असते. ते कशात उत्तम आहेत, त्यांच्या मनाची दिशा काय आहे, त्यांची स्वप्ने कोणती आहेत हे ओळखणे ही मोठ्यांची जबाबदारी आहे. सर्व मुले एकसारखी नसतात, त्यांची वाढ, क्षमता, आवडीनिवडी, भावनिक गरजा वेगळ्या असतात. त्यामुळे त्यांना समान संधी देणे म्हणजे प्रत्येकाला त्याच्या वैशिष्ट्याप्रमाणे विकसित होऊ देणे होय.

यासाठी कुटुंब, शाळा, समाज, शासन, स्वयंसेवी संस्था, माध्यमे या सर्वांनी एका दिशेने प्रयत्न करणे गरजेचे आहे. बालकांच्या विकासात गुंतवणूक करणे म्हणजे पायाभूत सुविधांमध्ये नव्हे तर मानवी विकासात गुंतवणूक करणे होय. ही गुंतवणूक कधीच वाया जात नाही, उलट ती एक संस्कृती, एक राष्ट्र, एक परिपूर्ण समाज घडवते.

१४ नोव्हेंबरचा ‘बालदिन’ हा केवळ आनंद, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम किंवा गोड खाऊचा दिवस नाही. हा दिवस बालकांच्या प्रश्नांना, त्यांच्या हक्कांना, त्यांच्या भविष्याला, त्यांच्या संरक्षणाला आणि त्यांच्या स्वप्नांना गांभीर्याने पाहण्याची स्मृती आहे. आज आपण जर प्रत्येक बालकाला सुरक्षित, सन्मानित, शिक्षित, प्रेमाने भरलेले आणि संधींनी समृद्ध वातावरण दिले तर उद्याचा समाज अधिक सक्षम, न्याय्य, समतामूलक, संवेदनशील आणि मानवतावादी असेल. कारण की “आजचे बालक म्हणजे उद्याचा नागरिक, उद्याचा समाज, उद्याचे राष्ट्र आहे.” म्हणूनच प्रत्येकाला हे जाणण्याची गरज आहे की आजचे बालक म्हणजेच भविष्यातील समाजाचे शिल्पकार आहेत.

डॉ. राजेंद्र बगाटे, (समाजशास्त्राचे अभ्यासक) मो. क्र. ९९६०१०३५८२, ईमेल – bagate.rajendra5@gmail.com

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande