
मुंबई, 13 नोव्हेंबर, (हिं.स.)। 'आफ्टर ओएलसी’ चित्रपटाचं पोस्टर समोर आलं तेव्हापासून मराठमोळी अभिनेत्री शिवानी सुर्वे चर्चेत आली आहे. या चित्रपटातील आपल्या लाडक्या शिवानीचा एक वेगळाच नक्षल, डँशिंग, रावडी लूक पाहून साऱ्यांच्या नजरा वळल्या. अर्थातच शिवानी ’आफ्टर ओएलसी’ या चित्रपटातून नेहमीपेक्षा एका वेगळ्याच भूमिकेतून दिसणार आहे. नक्षलवादी वेशात दिसणाऱ्या या लूकसाठी शिवानीने बरीच मेहनत घेतली आहे. इतकंच नाहीतर हा सिनेमा संपूर्ण भारतात मराठी, कन्नड, आणि हिंदी भाषेतही प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे कानडी भाषेसाठीही शिवानीने विशेष मेहनत घेतली.
’आफ्टर ओएलसी’ चित्रपटातील एकूणच लूकबाबत बोलताना शिवानीने म्हटलं, आजवर मी जे सिनेमे केले आहेत त्यातील भूमिकांपेक्षा ही भूमिका वेगळी आहे. त्याहीपेक्षा भूमिकेसाठीचा लुक वेगळा आहे. माझा या चित्रपटात नक्षलवादी लुक आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक सडागारा राघवेंद्र यांनी माझ्या या लुकसाठी मेहनत घेतली आहे. body language, expression वर मी विशेष लक्ष दिलं. कानडी भाषा शिकण्यासाठी कर्नाटकला वर्कशॉपमध्येही बरीच मेहनत घेतली. कानडीतील सगळे डायलॉग मराठीत लिहून मग ते पाठांतर करणं हे जणू दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यास करण्यासारखंच होतं. पण हे शिकणं एक गंमत होती असं मी म्हणेन. हा चित्रपट, यांतील भूमिका माझ्या सगळ्या आजवरच्या भूमिकांपेक्षा खूप खास आहे. नकारात्मक नाही म्हणू शकणार पण बंडखोर मताची भूमिका मी आजवर केलेली नाही. त्यामुळे हा वेगळाच अनुभव आहे.
शिवानीच्या भूमिकेबद्दल बोलायचं झालं तर, ती चित्रपटात शक्ती ही भूमिका साकारत आहे. जी त्या नक्षल ग्रुपची लीडर आहे. बाबांचा वारसा ती पुढे चालवत आहे. त्यामुळे तिचे हे पात्र कमांडिंग आहे. आणि ती निर्भीड, बिनधास्त व्यक्तिमत्त्वाची आहे. चित्रपटातील ऍक्शन सीन्सबाबत शिवानी म्हणाली, चित्रपटात बरेच ऍक्शन सीन्स आहेत. आणि यासाठी आम्ही सगळेच खूप रिहर्सल करायचो. आणि चित्रपटातील एक्शन ही मराठी प्रेक्षकांसाठी एक ट्रीट असणार आहे. यासाठी ‘केजीएफ’, ‘कांतारा’चे फाईट मास्टर विक्रम मोर यांनीच ‘आफ्टर ओएलसी’ या चित्रपटाच्या एक्शन सीन्ससाठी फाईट मास्टर ही धुरा उत्तमरित्या पेलवली. त्यांनी अगदी अचूक ज्ञान देत मनातील भीती दूर केली. माझ्यासाठी अर्थात हे भीतीदायक होतं पण विक्रम सरांनी ते अजिबात जाणवू दिलं नाही. माझी अशी इच्छा आहे की, ही भूमिका माझ्या आयुष्यातील एक वेगळाच टप्पा ठरावी. आणि या चित्रपटामार्फत मी केलेला हा नवा प्रयत्न प्रेक्षकांना नक्की आवडेल.
कन्नड सिनेसृष्टीतील दिग्दर्शक सडागारा राघवेंद्र यांनी हा चित्रपट मराठी आणि कन्नड भाषेत दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाची निर्मिती दिपक पांडुरंग राणे, विजयकुमार शेट्टी हवाराल, रमेश कोठारी आणि विजया प्रकाश यांनी ‘दिपक राणे फिल्म्स’ आणि ‘इंडियन फिल्म फॅक्टरी’ अंतर्गत केली आहे. येत्या 28 नोव्हेंबरला हा सिनेमा जगभरात मराठी, हिंदी आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर