
नवी दिल्ली , 16 नोव्हेंबर (हिं.स.)।दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटाच्या प्रकरणाची चौकशी वेगाने सुरू आहे. या तपासादरम्यान दिल्ली पोलिसांना घटनास्थळावरून 9 मिमी कॅलिबरचे तीन काडतूस — दोन जिवंत आणि एक रिकामा — मिळाले आहेत, मात्र ते चालवण्यासाठी वापरलेली पिस्तूल अद्याप सापडलेली नाही.
दिल्ली पोलिसांच्या सूत्रांच्या माहितीनुसार, काडतूस सापडल्यानंतर घटनास्थळी तैनात असलेल्या सर्व पोलिस कर्मचाऱ्यांचे काडतूस तपासले गेले.कोणत्याही कर्मचाऱ्याचा काडतूस गायब नसल्याचे स्पष्ट झाले.त्यामुळे हे काडतूस पोलिसांकडून आले असण्याची शक्यता पूर्णपणे नाकारण्यात आली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, 9 मिमी कॅलिबरचा गोळा सामान्य नागरिकांना वापरण्यास मनाई आहे. हा दारूगोळा फोर्सेस किंवा विशेष परवानाधारकांकडूनच वापरला जातो, त्यामुळे त्याचे घटनास्थळी मिळणे पोलिसांसाठी मोठे कोडे बनले आहे.
तपासात घटनास्थळावर ना पिस्तूल सापडले, ना तिचा कोणताही भाग. म्हणजेच काडतूस जागेवर मिळाले, पण ते चालवणारे शस्त्र गायब आहे, ज्यामुळे तपासाला नवीन दिशा मिळाली आहे. या प्रकरणाचा तपास दिवसेंदिवस आणखी गंभीर बनला असून दिल्ली पोलिस आता हे शोधण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत की हे काडतूस घटनास्थळी कसे पोहोचले आणि पिस्तूल कुठे लपवले गेले?
दरम्यान, स्फोटानंतरचे एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, ज्यात लोक जखमींना रहाटी (हातगाडी) वर टाकून हलवत आहेत, काहीजण जखमींना रस्त्याच्या कडेला झोपवताना दिसत आहेत, काही वाहनांना आग लागलेली स्पष्ट दिसते, ई-रिक्शाच्या साहाय्याने जखमींना रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तपासात आणखी उघड झाले आहे की जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी उमरने वापरलेली i20 कार दिल्ली व आसपासच्या 43 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांत दिसून आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode