
सोलापूर, 16 नोव्हेंबर (हिं.स.)। हॉटेल कामगारास विवस्त्र करून लोखंडी पाईपने जबर मारहाण करण्यात आल्याची गंभीर व अमानुष घटना समोर आली आहे. हॉटेल मालकाच्या विरोधात टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून टेंभुर्णी पोलिसांनी हॉटेल मालक लखन हरिदास माने यास तातडीने ताब्यात घेवून कारवाई केली आहे.
ही घटना तीन महिन्यांपूर्वी घडली होती.समाजमाध्यमावर या मारहाणीचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून या अमानुष मारहाणीचा सर्व स्तरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.याबाबत माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेची अधिक माहिती अशी की, टेंभुर्णी बायपास हायवे येथे हॉटेल 7777 या नावाने हॉटेल आहे.
या हॉटेलचा मालक लखन हरिदास माने (रा.टेंभुर्णी) याने त्यांच्याकडे कामास असलेल्या मॅनेजर निवास आप्पासाहेब नकाते (वय- ४४,रा.शिक्षक सोसायटी रोड) टेंभुर्णी यास पूर्ण विवस्त्र करून सर्व कामगारा समक्ष लोखंडी पाईपने पार्श्वभागावर बेदम मारहाण केली होती. या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यामावर सर्वत्र व्हायरल होत असून नेटकऱ्यातून या घटनेबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड