
कोल्हापूर, 18 नोव्हेंबर (हिं.स.)।
इनरव्हील क्लब्सच्या डिस्ट्रिक्ट ३१७ च्या वतीने आयोजित केलेल्या 'ऐक्यम' हा इनरव्हीलमधील राष्ट्रीय प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा प्रथमच कोल्हापुरात संपन्न होणार आहे. २१ ते २३ नोव्हेंबर रोजी हॉटेल सयाजी येथे संपन्न होणाऱ्या या मेळाव्यासाठी जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभेतील माजी विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद व राष्ट्रीय इनरव्हील असोसिएशनच्या अध्यक्षा ज्योती महिपाल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. देशभरातून इनरव्हील सदस्य या मेळाव्यासाठी कोल्हापुरात येणार असून आंतरराष्ट्रीय वक्ते व भारतीय पुराणकथांचे व्याख्याते अतुल सत्य कौशिक व महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड (एमकेसीएल) चे माजी कार्यकारी संचालक व मुख्य मार्गदर्शक डॉ. विवेक सावंत वक्ते म्हणून मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती इनरव्हील डिस्ट्रिक्ट ३१७ च्या डिस्ट्रिक्ट चेअरमन सौ. उत्कर्षां संग्राम पाटील यांनी आज दिली.
त्या म्हणाल्या, तीन दिवस आयोजित या मेळाव्यामध्ये 'इनरव्हील आयडॉल'चा महाअंतिम सोहळा दि २१ नोव्हेंबर रोजी होणार आहे. उद्योजकांना त्यांची उत्पादने प्रदर्शित करण्याची संधी देण्यासाठी एक 'प्रकल्प मेळावा' देखील आयोजित करण्यात आला आहे जो भारतातील इनरव्हीलमधील प्रमुख पदाधिकाऱ्यांना विविध क्षेत्रातील उपक्रम राबवण्यास मदत करू शकेल. दि.२२ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील शाळांमधील ६०० पेक्षा अधिक दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धादेखील आयोजित करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर महिला सबलीकरणाकरिता 'सक्षम स्त्री, सक्षम भारत' या योजनेअंतर्गत चार महिला लाभार्थ्यांना 'गुलाबी ई- रिक्षांचे' वितरण करण्यात येणार असून 'यशस्वी विद्यार्थी-यशस्वी समाज' या योजनेअंतर्गत दोन स्टेम लॅब तसेच जयपूर फूट प्रकल्प अंतर्गत १०२ लाभार्थींना मदत केली जाणार आहे. 'प्रीझम' या इनरव्हील प्रोजेक्ट बिझनेस फेअरमध्ये 'अ' श्रेणीतील ११ स्टॉल उपलब्ध असून स्थानिक व्यवसायांसाठी 'ब' श्रेणीतील १० स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले आहेत, असेही सौ. उत्कर्षां पाटील यांनी यावेळी सांगितले.
मेळाव्यासाठी असोसिएशनच्या राष्ट्रीय अध्यक्षा सौ. ज्योती महिपाल यांच्यासह राष्ट्रीय संपादक कमला सेलवम, राष्ट्रीय असोसिएशनची कार्यकारी समिती, इनरव्हील डिस्ट्रिक्ट ३१७ च्या डिस्ट्रिक्ट चेअरमन उत्कर्षां पाटील, जिल्हा कार्यकारी समिती तसेच संपूर्ण देशातील आजी-माजी जिल्हाध्यक्ष व पधाधिकारी उपस्थित राहणार आहेत. 'ऐक्यम' हा इनरव्हीलमधील राष्ट्रीय प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी उगार शुगर वर्क्स लिमिटेड, दत्ताजीराव परशराम माने सराफ, कोल्हापूर कॅन्सर सेंटर - कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिका, महिंद्रा प्रायव्हेट लिमिटेड, हॉटेल अनुग्रह डिलक्स, विश्वछाया ग्रुप ऑफ कंपनीज, एलआयसी मनीष माणिकचंद मुनोत व मार्व्हलस ग्रुप ऑफ कंपनीज यांचे मोलाचे योगदान लाभले आहे.
यावेळी मेळाव्याच्या सल्लागार, असोसिएशनच्या माजी खजिनदार डॉ. विद्युत शहा, संयोजक व माजी डिस्ट्रिक्ट चेअरमन राधिका शिरगावकर, सहसंयोजक माजी असोसिएशन सचिव रत्ना बेहरे, माजी डिस्ट्रिक्ट चेअरमन वैशाली लोखंडे, खजिनदार व माजी जिल्हाध्यक्षा महानंदा चंदरगी, जिल्हा प्रकल्प समन्वयक अध्यक्षा नंदा झाडबुके आदी उपस्थित होत्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar