
परभणी, 18 नोव्हेंबर (हिं.स.)।
पूर्णा शहरात नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजमुद्रा चौक परिसरात एका वाहनातून तब्बल 30 लाख रुपयांची संशयित रक्कम आचारसंहिता पथकाने जप्त केली. पथक प्रमुख नारायण मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली.
साडेअकरा ते बारा वाजण्याच्या दरम्यान पथक राजमुद्रा चौकात नियमित तपासणी करत असताना एमएच 26 बी एक्सएक्स 6596 क्रमांकाची कार संशयितरित्या जात असल्याचे दिसले. वाहनाची तपासणी केली असता गाडीत असलेल्या बॅगमध्ये तीस लाख रुपयांची मोठी रोख रक्कम आढळून आली.
तपासणी पथकातील विस्तार अधिकारी शिवानंद लेंडाळे, पुरी आणि राठोड यांनी मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण वाहनाचे चित्रीकरण केले. त्यानंतर पंचनामा तयार करून रक्कम जप्त करण्यात आली.
जप्त केलेली संपूर्ण रक्कम पूर्णा कोषागार कार्यालयात जमा करण्यात आल्याची माहिती निर्वाचन अधिकारी तथा तहसीलदार माधवराव बोथीकर यांनी दिली. रकमेचा स्त्रोत व उद्देशाबाबत पुढील चौकशी सुरु असल्याचेही त्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis