

रत्नागिरी, 18 नोव्हेंबर, (हिं. स.) : मधुमेहामुळे जगभरात सध्या दर अर्ध्या मिनिटाला एका व्यक्तीचा पाय मधुमेहामुळे कापावा लागतो. योग्य वेळी तपासणी न केल्यामुळे आणि उपचार न घेतल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे; मात्र मधुमेही व्यक्तींनी शरीरातील अन्य महत्त्वाच्या अवयवांबरोबरच पायांच्या आरोग्याबद्दलही दक्ष राहून नियमित तपासणी करून वेळीच उपचार घेतल्यास यातील ८० टक्के जणांचे पाय वाचवणे शक्य आहे, असे प्रतिपादन ठाण्यातील प्रथितयश मधुमेहतज्ज्ञ (डायबेटॉलॉजिस्ट) डॉ. आशीष सरवटे यांनी केले.
जागतिक मधुमेहदिनाच्या निमित्ताने 'मधुमेहींनी घ्यायची पायाची काळजी' या विषयावर त्यांचे विशेष व्याख्यान निष्कर्ष डायग्नॉस्टिक सेंटरने रत्नागिरीत आयोजित केले होते. डॉ. सरवटे २३ वर्षांहून अधिक काळ मधुमेहतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. या व्याख्यानात त्यांनी मधुमेहामुळे निर्माण होणाऱ्या गुंतागुंतींवर प्रकाश टाकतानाच खासकरून पायांच्या आरोग्याबद्दल स्लाइड-शोसह मार्गदर्शन केले. यावेळी निष्कर्ष डायग्नॉस्टिक सेंटरचे डॉ. नीलेश नाफडे, डॉ. निनाद नाफडे उपस्थित होते. विविध वयोगटांतील रत्नागिरीकर या व्याख्यानाचा लाभ घेतला.
१९२१मध्ये चार्ल्स बेस्ट आणि फ्रेड्रिक बँटिंग यांनी इन्सुलिनचा शोध लावला. डॉ. बँटिंग यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने १४ नोव्हेंबरला जागतिक मधुमेह दिन साजरा केला जातो; मात्र तीन हजार वर्षांपूर्वी भारतात महान आयुर्वेदाचार्य चरक आणि सुश्रुत यांनी मधुमेहाचा शोध लावला होता, अशी माहिती देतानाच डॉ. आशीष सरवटे यांनी आज भारताला मधुमेहाची राजधानी म्हणून ओळख मिळाल्याबद्दल चिंता व्यक्त केली. मधुमेह (डायबेटीस) हा स्वादुपिंडाचा असा विकार आहे, की ज्यामुळे शरीराच्या सर्वच अवयवांवर विपरीत परिणाम होतो; मात्र पायांच्या नसांवर (नर्व्हज) होणाऱ्या त्याच्या दुष्परिणामांकडे फारसे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. त्यामुळे पाय कापण्यासारखे दुर्दैवी पाऊल उचलण्याची वेळ येते, असे डॉ. सरवटे म्हणाले.
डायबेटीसमुळे पायाच्या नर्व्ह्जची संवेदनशीलता कमी होत जाते. त्यामुळे पायांना छोट्या जखमा झाल्या तरी काही वेळा लक्षात येत नाही. आपल्याला मधुमेह झाला आहे हेच जवळपास एकतृतीयांश व्यक्तींना माहिती नसते. त्यामुळे पायांच्या जखमांकडे दुर्लक्ष केले जाते. डायबेटीसमुळे त्या जखमा लवकर भरत नाहीत आणि किरकोळ जखम म्हणून दुर्लक्ष केल्यामुळे अखेर गँगरीन होऊन पाय कापण्याची वेळ येते. अशी वेळ येऊ नये म्हणून मधुमेही व्यक्तींनी आपल्या पायांची विशेष काळजी घ्यावी. दररोज रात्री झोपताना आपल्या पायांचे तळवे तपासावेत. त्यांना तेल लावावे, जेणेकरून त्यांचा मऊपणा कायम राहील. अनवाणी चालू नये. घराबाहेर पडताना नेहमी पायात बंदिस्त सँडल किंवा शूज घालावेत आणि ते योग्य मापाचे असावेत. पायाची सर्व बोटे त्यात व्यवस्थित राहत आहेत याची खात्री करावी. आवश्यकता भासल्यास आपल्या मापाच्या चपला तयार करून घ्याव्यात किंवा डायबेटिक फूटवेअर वापरावेत. पायाला किरकोळ जखम झाली, तरी दुर्लक्ष करू नये. नखे वेळेवर आणि सरळ कापावीत, असा सल्ला डॉ. सरवटे यांनी दिला.
मधुमेही व्यक्तींनी किमान वर्षातून एकदा सर्व अवयवांच्या तपासण्या करून घेणे गरजेचे आहे. त्यात पायांच्या नसांच्या तपासणीचाही समावेश असावा. एचबी एवनसी सातच्या आत राहील या दृष्टीने प्रयत्नशील असणे गरजेचे आहे. आवश्यकतेनुसार आणि वैद्यकीय सल्ल्याने इन्सुलिनसह योग्य औषधोपचार, वय-वजन-उंची यांच्या अनुषंगाने योग्य, वैविध्यपूर्ण आहार, आहारात सॅलड्सचा मोठ्या प्रमाणावर समावेश आणि नियमित व्यायाम या बाबी मधुमेहींनी पाळणे अत्यंत आवश्यक आहे, असे डॉ. सरवटे यांनी सांगितले. दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी दिवसभर डॉ. आशीष सरवटे रत्नागिरीत निष्कर्ष डायग्नॉस्टिक सेंटरमध्ये रुग्णतपासणीसाठी येत असल्याची माहितीही या वेळी देण्यात आली.
डॉ. नीलेश नाफडे यांनी प्रास्ताविकात चाचण्या करून घेण्याबद्दल अनेकांच्या मनात असलेल्या शंका आणि चुकीच्या धारणा, तसेच खर्चामुळे त्या चाचण्या टाळण्याकडे असलेला कल यावर भाष्य केले. इन्सुलिन घ्यायला लागणे म्हणजे काही तरी भयंकर आहे किंवा नेहमीच्या टेस्टव्यतिरिक्त वेगळी काही टेस्ट डॉक्टरांनी सांगितली, तर ते काही तरी भयंकर आहे, असा अनेकांचा गैरसमज असतो, असे निरीक्षण नोंदवताना डॉ. नाफडे यांनी मधुमेह असलेल्या सेलेब्रिटींबद्दलही सांगितले. देवेंद्र फडणवीस, अरविंद केजरीवाल, सोनम कपूर, समंथा प्रभू, वसीम अक्रम अशा विविध क्षेत्रांतील प्रसिद्ध व्यक्ती मधुमेहासह आपले जीवन उत्तमरीत्या जगत असल्याचे त्यांनी सांगितले. आजाराने गंभीर रूप धारण केल्यानंतर चाचण्या करणे म्हणजे एक प्रकारे पोस्ट-मॉर्टेमच असते. कारण त्या चाचणीचा उपयोग पाय कुठे कापायचा हे ठरवण्यासाठी होतो. त्याऐवजी, योग्य वेळी चाचण्या केल्यास पाय किंवा संबंधित अवयव वाचवण्याच्या दृष्टीने उपचार करण्याकरिता त्या चाचण्यांचा उपयोग होऊ शकतो, असे डॉ. नाफडे यांनी सांगितले. डायबेटीसशी संबंधित सात चाचण्यांची माहिती देतानाच त्यांपैकी सहा चाचण्या रत्नागिरीत निष्कर्ष डायग्नॉस्टिक सेंटरमध्ये उपलब्ध असल्याचे ते म्हणाले. सातवी चाचणीही लवकरच रत्नागिरीत उपलब्ध केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. जनजागृतीसाठी अशा प्रकारची व्याख्याने वेळोवेळी आयोजित करण्याचा मानस डॉ. निनाद नाफडे यांनी व्यक्त केला.
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी