


रत्नागिरी, 18 नोव्हेंबर, (हिं. स.) : येथील अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळातर्फे भगवान परशुराम व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.
येत्या २१ ते २३ नोव्हेंबर या तीन दिवशी दररोज सायंकाळी ५ ते ७ या वेळेत जोशी पाळंद येथील ल. वि. केळकर सभागृहाच्या भगवान परशुराम सभागृहात ही व्याख्यानमाला रंगणार आहे. त्याचा तपशील असा -
शुक्रवार २१ नोव्हेंबर - डोंबिवली येथील प्रसिद्ध वक्ते विशाल कवीश्वर यांचे ज्ञानेश्वरांचे पसायदान या विषयावर व्याख्यान होणार आहे. श्री. कवीश्वर बी रॉम, जीडीसीए पदवी प्राप्त असून ठिकठिकाणी त्यांची विविध विषयांवर व्याख्याने झाली आहेत. हिंदू समाज माऊलींच्या पसायदानाबाबतीत एखाद्या कार्यक्रमाची (हरिपाठ पारायण, ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तन अथवा प्रवचन) सांगता करण्यसाठी परमेश्वराकडे मागवायचे दान एवढ्याच मर्यादित विचारामध्ये अडकलेला आहे. परंतु हे माऊलींचे पसायदान म्हणजे एक अमर्याद समुद्र असून ती एक जगत्कल्याणासाठी केलेली एक विश्व प्रार्थना आहे आणि ते तळमळीचे स्तोत्र आहे. विश्वकल्याणासाठी माउलींनी जी प्रार्थना केली त्याचा अर्थ या व्याख्यानाच्या माध्यमातून कवीश्वर सांगणार आहेत.
शनिवार दि. २२ नोव्हेंबर - मुंबईतील प्रसिद्ध वक्ते सीए चंद्रशेखर वझे अपरिचित रामायण या विषयावर व्याख्यान देणार आहेत. या व्याख्यानातून ते वाल्मीकि-रामायणातील सर्वसामान्यपणे लोकांना माहीत नसलेल्या गोष्टी सांगणार आहेत. वाल्मीकी कोण होते, त्यांनी रामायण कशासाठी लिहिले, आपल्याला माहीत नसलेल्या कोणत्या गोष्टी रामायणात आहेत, आपल्याला माहीत असलेल्या कोणत्या गोष्टी रामायणात नाहीत, श्री रामाचे प्रशासन कसे होते, रामराज्य का म्हणायचे, रामायणातून नेमके काय शिकायचे, हे त्यांच्या व्याख्यानातून स्पष्ट होणार आहे.
रविवार दि. २३ नोव्हेंबर - मुंबईचे प्रसिद्ध वक्ते सतीश जोशी छत्रपती शिवाजी महाराज-द मॅनेजमेंट गुरू या विषयावर दृक्श्राव्य पद्धतीने व्याख्यान देणार आहेत. श्री. जोशी फार्मास्युटिकल कंपन्यांमध्ये ३६ वर्षे नोकरी करून निवृत्त झाले. केमिकल कंपन्यांच्या क्वालिटी अॅश्युरन्सची कन्सल्टन्सी व केमिकल कंपन्यांची ISO 9001 Certification Quality Audits ची कामे ते करतात. गेली काही वर्षे माहीम येथील दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात कार्यवाह म्हणून ते कार्यरत आहेत. अफझलखान वध, सिद्दी जौहर, शाहिस्तेखान, आग्र्याहून सुटका अशा श्रीमान योगीच्या निवडक प्रसंगांचे तसेच 'महाराज एक सिद्ध योगी' या विषयाअंतर्गत महाराज व तुकाराम महाराज आणि महाराज व समर्थ रामदास स्वामी यांच्या भेटींच्या प्रसंगांचे अभिवाचनाचे कार्यक्रम त्यांनी अनेक ठिकाणी केले आहेत. याबरोबरच 'हिंदी मराठी चित्रपट संगीत' हा त्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असून आत्तापर्यंत जुन्या चित्रपट संगीतावर आधारित अनेक कार्यक्रम त्यांनी केले आहेत. मराठीतील लोकप्रिय 'बाईपण भारी देवा' चित्रपटात रोहिणीताई हट्टंगडी यांच्या यजमानांची भूमिका त्यांनी केली होती, तर सध्या गाजत असलेल्या 'दशावतार' चित्रपटात नायिकेच्या वडिलांची छोटीशीच भुमिका त्यांनी केली आहे.
व्याख्यानमालेचा आस्वाद सर्व रसिक श्रोत्यांनी घ्यावा, असे आवाहन चित्पावन ब्राह्मण मंडळाने केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी