
नाशिक, 18 नोव्हेंबर, (हिं.स.) : महापालिकेची अंतिम प्रभागरचना जाहीर झाली असून त्यावर २४ नोव्हेंबरपर्यंत हरकती घेता येणार आहे. मागील निवडणुकीप्रमाणे २०११च्या लोकसंख्येचा आधार, १२२ सदस्य संख्या, चार सदस्यीय प्रभाग पद्धत आणि प्रभागरचनेच्या प्रक्रियेत कुठलाही बदल झालेला नाही. त्यामुळे २०१७ च्या निवडणुकीप्रमाणेच प्रभागरचना 'जैसे थे' राहिली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार शासनाच्या नगरविकास विभागाने २०२२ मधील प्रभागरचनेचे आदेश कायम ठेवत, चार सदस्यीय प्रभागरचना करण्याचे निर्देश महापालिकांना दिले होते. त्यावर महापालिकेने २०१७ च्या निवडणुकीप्रमाणे १२२ सदस्यसंख्या असलेले चार सदस्यीय २९ व तीन सदस्यीय दोन अशा एकूण ३१ प्रभागांची प्रारूप रचना तयार करून दि. ५ ऑगस्टला राज्याच्या नगरविकास विभागाला सादर केली होती. त्यानंतर नगरविकास विभागाने प्रारूप प्रभागरचनेचा आराखडा राज्य निवडणूक आयोगाला सादर केला होता.
४८ हजार लोकसंख्येचे प्रभागप्रभागरचना करताना लोकसंख्येच्या प्रगणक गटांची जुळवणी करण्यात आली आहे. त्यानुसार प्रभागाची लोकसंख्या निश्चित करण्यात आली असून यामध्ये सरासरी ४८ हजार लोकसंख्येचा एक प्रभाग अस्तित्वात आला आहे. दरम्यान, महापालिकेत १३ मार्च २०२२ पासून प्रशासकी राजवट लागली असून निवडणुका कधी होणार? याकडे राजकीय पदाधिकारी, कार्यकत्यांचे लक्ष लागले होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV