
रायगड, 18 नोव्हेंबर (हिं.स.)। धाकटे शहापूर परिसरात सिनारमास कंपनीकडे जाणाऱ्या पोहोच रस्त्याच्या कामासाठी एमआयडीसीतर्फे स्लॅग, मुरूम व मातीचा मोठ्या प्रमाणात भराव केल्याचे उघड झाले आहे. कोणतीही पूर्वपरवानगी न घेता करण्यात आलेल्या या भरावामुळे स्थानिक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. विशेष म्हणजे, सुजित पाटील यांच्या शेततळ्यात हा स्लॅग वाहून गेल्याने तळ्यातील मासे मृतावस्थेत आढळले असून, तळ्याचे पाणी पांढरट व गढूळ झाले आहे. या सर्व प्रकाराची नोंद महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रत्यक्ष पाहणी अहवालात करण्यात आली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सीमांकनाच्या नावाखाली रस्त्याचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र, ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी याला तीव्र विरोध केला. शेतकऱ्यांच्या मते, भूसंपादन अधिनियम व औद्योगिक विकास अधिनियमातील तरतुदीनुसार मोबदला, पुनर्वसन, मुलांना रोजगार, तसेच 15 टक्के विकसित भूखंड मिळण्यासंदर्भात कोणतीही बैठक न घेता एमआयडीसीने मनमानी कारभार सुरू ठेवला. शेतकऱ्यांनी चर्चा न होईपर्यंत काम थांबवण्याची विनंती केली असतानाही पोलीस बंदोबस्तात भरावाची कामे सुरूच राहिली.
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी डॉ. गजानन खडकीकर यांनी रविवारी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. त्यांच्या अहवालानुसार, गट क्रमांक 264 व 265 मधील जागेत मोठ्या प्रमाणात स्लॅग टाकण्यात आला असून, हा स्लॅग शेततळ्यातही आढळून आला आहे. तळ्यातील मासे मोठ्या प्रमाणात मृतावस्थेत आढळले. पाणी व स्लॅगचे नमुने तपासणीसाठी गोळा करण्यात आले आहेत. त्याचबरोबर भराव करताना कांदळवनाची तोड झाल्याचेही अहवालात नमूद केले आहे.
रुपेश पाटील यांनी शेतकऱ्यांना अद्याप मोबदला नसल्याने हा भराव बेकायदेशीर असल्याचा आरोप केला. शेतकऱ्यांशी चर्चा न करता, त्यांच्या मालकीच्या जमिनीत अनधिकृतपणे काम केले जात असल्याने ग्रामस्थांत संताप पसरला आहे. पाटील यांनी याबाबत पोयनाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
दरम्यान, वन विभागानेही कांदळवन तोडीची पाहणी करून ती त्वरित थांबवण्याच्या सूचना दिल्या आहेत. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी या सर्व प्रकरणावर भाष्य करण्यास नकार दिल्याने संशय अधिकच गडद झाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके