
नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर, (हिं.स.) - महिला प्रीमियर लीगचा चौथा हंगाम ७ जानेवारीपासून सुरू होणार आहे. अंतिम सामना ३ फेब्रुवारी रोजी खेळवला जाण्याची शक्यता आहे. स्पर्धेचे सुरुवातीचे लीग सामने मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडियममध्ये खेळवले जाऊ शकतात, जिथे अलीकडेच महिला विश्वचषक अंतिम सामना झाला होता.
कोट्टांबी स्टेडियमवरील अंतिम सामन्यासह उर्वरित सामन्यांसाठी बडोद्याची निवड करण्यात आली आहे. भारत-न्यूझीलंड एकदिवसीय सामना ११ जानेवारी रोजी होणार असल्याने बडोद्यातील सामने १६ जानेवारीपासून सुरू होण्याची अपेक्षा आहे. या स्पर्धेचा पहिला मेगा लिलाव या महिन्यात २७ नोव्हेंबर रोजी दिल्लीत होणार आहे.
बीसीसीआयने अद्याप अधिकृतपणे फ्रँचायझी मालकांना या वेळी कोणते शहर सामने आयोजित करतील याची माहिती दिलेली नाही. पण या ठिकाणांबद्दल अनौपचारिक चर्चा सुरू आहे. २७ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे होणाऱ्या WPL लिलावादरम्यान संघांना औपचारिक सूचना मिळण्याची अपेक्षा आहे. यावर्षी यजमानपदासाठी लखनऊ, बंगळुरू, मुंबई आणि बडोदा या चार शहरांनी बोली लावली होती. यामध्ये मुंबई आणि बडोदा यांची निवड झाली आहे.
आतापर्यंत, महिला प्रीमियर लीगचे तिन्ही हंगाम मार्चमध्ये खेळवले गेले आहेत. जानेवारीमध्ये ही स्पर्धा पहिल्यांदाच होणार आहे. याची दोन मुख्य कारणे आहेत.
एक म्हणजे पुरुषांचा T20 विश्वचषक फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात भारत आणि श्रीलंकेत सुरू होईल आणि एक महिना चालणार आहे. जानेवारी हा WPL साठी कायमस्वरूपी विंडो मानली जात आहे जेणेकरून लीगच्या तारखा इतर कोणत्याही T20 लीग किंवा ICC च्या फ्युचर टूर प्रोग्रामशी जुळणार नाहीत.
मुंबई इंडियन्सने सर्वाधिक दोन वेळा WPL चे विजेतेपद पटकावले आहे. त्यांनी २०२३ मध्ये पहिला हंगाम आणि २०२५ मध्ये तिसरा हंगाम जिंकला होता. २०२४ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने दुसरा हंगामात अजिंक्यपद पटकावले होते.
WPL च्या पुढील हंगामासाठी रिटेन्शन यादी ६ नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आली. यापैकी कर्णधार हरमनप्रीत कौरला मुंबईने, स्मृती मानधनाला बंगळुरूने आणि जेमिमा रॉड्रिग्जला दिल्लीने संघात कायम ठेवले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे