
हैदराबद, 19 नोव्हेंबर (हिं.स.) : आंध्र प्रदेशमध्ये कुख्यात माओवादी माडवी हिड्मा याच्या मृत्यू नंतर दुसऱ्या दिवशीही मारेदुमिल्ली परिसरात झालेल्या चकमकीत 7 नक्षलवादी ठार झाल्याची माहिती मिळाली आहे. आंध्र प्रदेश गुप्तचर विभागाचे एडीजी महेश चंद्र लड्डा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की ठार झालेल्या नक्षल्यांमध्ये 3 महिला देखील आहेत. सर्वांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठार झालेल्या माओवादींपैकी एक मेतुरी जोखा राव उर्फ टेक शंकर होता. तो श्रीकाकुलमचा रहिवासी होता आणि आंध्र–ओडिशा सीमेवरील कामकाजाची जबाबदारी पाहत होता. तो तांत्रिक बाबींमध्ये पारंगत होता आणि शस्त्रसाठा व संप्रेषण तंत्रज्ञानावर त्याची चांगली पकड होती. एडीजी लड्डा यांनी सांगितले की शंकर मागील 20 वर्षांपासून नक्षलवादी चळवळीशी जोडलेला होता आणि प्रत्येक सुरक्षा मोहिमेदरम्यान आपले ठिकाण बदलत असे. त्यांचा अंदाज आहे की नक्षलवादी चळवळीला पुन्हा बळकटी देण्यासाठीच शंकर दक्षिण भारतातील या राज्यात आला होता. यासोबतच, आंध्र प्रदेश पोलिसांनी राज्यातील विविध भागांतून सुमारे 50 भाकप (माओवादी) कार्यकर्त्यांना अटक केली आहे. कृष्णा, एलुरु, एनटीआर विजयवाडा, काकिनाडा आणि डॉ. बी.आर. आंबेडकर कोणासीमा या जिल्ह्यांत हा मोठा अभियान राबवण्यात आला. या कारवाईमुळे माओवादी संघटनेच्या दक्षिण बस्तर व दंडकारण्यातील नेटवर्कला मोठा फटका बसला आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अटक करण्यात आलेल्यांमध्ये वरिष्ठ माओवादी, संप्रेषण तज्ज्ञ, सशस्त्र पथकातील सदस्य आणि पक्षातील इतर कार्यकर्ते यांचा समावेश आहे. हे सर्वजण माडवी हिड्मा याच्या जवळून काम करत होते. हिड्मा हा भाकपा–माओवादी पक्षाच्या केंद्रीय समितीचा सदस्य असल्याचे सांगितले जाते.
लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे मंगळवारी छत्तीसगड–आंध्र प्रदेश सीमेवर झालेल्या चकमकीत एक कोटी रुपयांचे बक्षीस घोषित केलेला नक्षली माडवी हिड्मा ठार झाला. या चकमकीत हिड्मा व त्याची पत्नी राजे उर्फ रजक्का यांसह एकूण सहा नक्षली मारले गेले. नक्षलींकडून काही शस्त्रे, दारुगोळा—विशेषत: दोन एके-47 रायफल्स—किट-बॅगसह इतर साहित्य जप्त करण्यात आले. --------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी