
अकोला, 19 नोव्हेंबर (हिं.स.)।
शहरातील आरोग्यव्यवस्थेचे चित्र दिवसेंदिवस बिकट होत असतानाच सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या संभाव्य खाजगीकरणाचा मुद्दा चांगलाच गाजू लागला आहे. कर्मचारी अनुपस्थिती, डॉक्टर वेळेवर न येणे, रुग्णांची होत असलेली हेळसांड या तक्रारींची मालिका वाढत असल्याने पश्चिम अकोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान यांनी बुधवारी सकाळी अचानक रुग्णालयाला भेट देत पाहणी केली. या पाहणीत अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्याने त्यांनी प्रशासनावर थेट घणाघाती आरोपांचा भडीमार केला.
आकस्मिक भेटीदरम्यान अनेक डॉक्टर रजा असूनही हजर नसल्याचे उघड झाले. कोट्यवधी रुपयांची अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध असूनही ती धूळ खात पडलेली, जनसेवेत उपयोगात न आणलेली यावर आ. साजिद खान यांनी संताप व्यक्त केला. आरोग्यसेवा पुरवणाऱ्या महत्त्वाच्या रुग्णालयात इतक्या मोठ्या प्रमाणावर अनियमितता कशा काय घडू शकतात? असा सवाल त्यांनी प्रशासनाला चोपला.
डीन मुंबईत कोणत्या बैठकीसाठी? – खाजगीकरणाचा डाव?
या सर्व अनियमिततेबाबत त्यांनी सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय सोनूने यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला असता, ते मुंबईतील एका बैठकीसाठी गेले असल्याचे समोर आले. मात्र, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही बैठक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे कंत्राट खाजगी कंपनीकडे देण्याच्या संदर्भात असल्याचा आरोप आ. साजिद खान यांनी केला.
“सरकार मागच्या दाराने रुग्णालयाचे खाजगीकरण करण्याचा डाव रचत आहे,” असा थेट आरोप त्यांनी यावेळी केला.
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा ढासळली
सर्वोपचार रुग्णालयापासून जिल्हा स्त्री रुग्णालयापर्यंत सर्वच ठिकाणी मोठ्या प्रमाणात रिक्त पदे, प्रभारी अधिकाऱ्यांवर अवलंबून चालणारे कामकाज, रुग्णांची होत असलेली गैरसोय – हा आरोग्य विभागाचा विदारक चेहरा असल्याचे त्यांनी नमूद केले. दोन महिन्यांपासून स्त्री रुग्णालयातील प्रशासन प्रभारींच्या भरोशावर चालत असल्याने तक्रारींचा पाऊस पडत आहे.
खाजगीकरण केल्यास तीव्र जन आंदोलनाचा इशारा
“जनतेच्या पैशातून उभारलेले हे सुपर स्पेशालिटी रुग्णालय खाजगी कंपनीच्या ताब्यात देण्याचा प्रयत्न कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही,” असा इशारा आमदार साजिद खान यांनी दिला.
जर सरकारने हा निर्णय पुढे रेटला, तर अकोल्यातील जनतेला घेऊन तीव्र जन आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा त्यांनी रोखठोक शब्दांत दिला.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे