बीड नगरपरिषदेवर भाजपची सत्ता येण्याची शक्यता
बीड, 19 नोव्हेंबर, (हिं.स.)। बीड नगर परिषदेची निवडणूक रंगतदार होते आहे भारतीय जनता पक्षाने 52 उमेदवार उभे केले आहेत तसेच भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्ष पदासाठी नवा उमेदवार दिल्यामुळे ही रंगत वाढली आहे. भारतीय जनता पक्षाने डॉक्टर योगेश क्षीरसागर आणि
बीड नगरपरिषदेवर भाजपची सत्ता येण्याची शक्यता


बीड, 19 नोव्हेंबर, (हिं.स.)। बीड नगर परिषदेची निवडणूक रंगतदार होते आहे भारतीय जनता पक्षाने 52 उमेदवार उभे केले आहेत तसेच भारतीय जनता पक्षाने नगराध्यक्ष पदासाठी नवा उमेदवार दिल्यामुळे ही रंगत वाढली आहे. भारतीय जनता पक्षाने डॉक्टर योगेश क्षीरसागर आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिलेला प्रवेश अत्यंत महत्त्वाचा ठरतो आहे.

यावेळी भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षांची पारडे जड आहे. यातच पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्याकडे लक्ष दिले आहे.

नगरपालिका ही कार्यकर्त्यांची आणि शहरातील, प्रभागातील समस्यांवर व शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर लढली जाणारी निवडणूक असते. मात्र बीडमध्ये सध्या तरी जनतेचे प्रश्न दूर असून स्वतःचे राजकीय अस्तित्व, राजकीय प्रतिष्ठा टिकवणे याच दृष्टीने निवडणूक लढवली जात आहे. तसेच आरोप-प्रत्यारोप होत आहेत.

बीड नगरपालिका ही अ वर्ग दर्जाची व ५२ नगरसेवक असलेली जिल्ह्यातील सर्वात मोठी नगरपालिका आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी आणि एमआयएम यांच्यामध्ये लढत होईल. प्रामुख्याने दोन्ही राष्ट्रवादींमध्ये चुरस होईल, अशी शक्यता होती. परंतु, जशी उमेदवार निवड, अर्ज भरणे प्रक्रियेला सुरुवात झाली, तशी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात अंतर्गत संघर्षांची ठिणगी पडली. डॉ. योगेश क्षीरसागर यांनी समर्थकांची स्वतंत्र बैठक घेण्यापासून याला सुरुवात झाली. त्यानंतर पक्षाने अधिकृत म्हणून पुन्हा दुसरी बैठक घेतली. उमेदवार निवडीसाठी मुलाखतींचा फार्सही केला. असे असतानाच सूत्रे कुणाच्या हाती यावरून अंतर्गत कलह टोकाला गेला, डॉ. योगेश क्षीरसागर यांनी स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठीशेवटच्या क्षणी भाजप प्रवेश केला अन् भाजपचे ५२ नगरसेवक उभे केले.

त्यामुळे या निवडणुकीत अधिकच रंगत आली. अजित पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध डॉ. योगेश क्षीरसागर असे चित्र निर्माण झाले. आता दोन्ही बाजूंनी अस्तित्व आणि प्रतिष्ठा यासाठी ही निवडणूक लढली जात आहे.

या निवडणुकीचे वेगळेपण म्हणजे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचा उमेदवार हा सव्हें करून खुद्द अजित पवार यांनी निश्चित केला. हा उमेदवारही आ. संदीप क्षीरसागर यांच्या गोटातून अखेरच्या क्षणी खेचून आणलेला आहे. पवार बीडचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे ही निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची असेल व ती राखण्याची जबाबदारी निवडणुकीचे सारथ्य करणारे मा. आ. अमरसिंह पंडित, आ. पंडित यांच्याकडे आहे.

अनुसूचित जाती महिलेसाठी नगराध्यक्षपद राखीव झाल्यानंतर अखेरच्या क्षणी सर्व उमेदवारांची घोषणा झाली. यात जातीय, धार्मिक समीकरणे लक्षात घेऊन उमेदवार दिले गेले. दोन्ही राष्ट्रवादी व एमआयए‌मने मुस्लिम, दलित मतांचा विचार केला तर भाजपने तिघांमधील मतविभाजनाचा फायदा घेताना धार्मिक मुद्दा पुढे करता येईल, असा उमेदवार दिला. सर्वच नावे आश्चर्यकारकरीत्या समोर आली.

डॉ. योगेश क्षीरसागर यांचे काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर हे कोणत्याही राजकीय पक्षात नाहीत. ते अलिप्त आहेत. त्यांच्या अलिप्तपणामुळे त्यांचे अनेक समर्थकही या निवड‌णुकीत जयदत्त यांच्यापासून दुरावले, मात्र, क्षीरसागर मुक्तीचा नारा देत राष्ट्रवादी, शिवसेना, शिवसंग्राम एकत्र आल्यानंतर ते बीडमध्ये सक्रिय झाले. अनेकांच्या भेटी त्यांनी घेतल्या आहेत. डॉ. योगेश यांना ते मदत करत आहेत.

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande