
- मोदी-शाह यांच्यासह भाजपाशासित मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती- सुरक्षेची जबाबदारी एसपीजीकडे
पाटणा, 19 नोव्हेंबर (हिं.स.) - बिहारमध्ये नुकत्याच पार पडलेल्या निवडणूक निकालानंतर नितीश कुमार (जदयु) आणि भाजपा पुन्हा एकदा संयुक्त सरकार स्थापन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. महत्वाचे म्हणजे नितीश कुमार यंदा दहाव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून उद्या, गुरुवारी पाटण्यातील ऐतिहासिक गांधी मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. त्यापूर्वी, आज एनडीएच्या घटक पक्षांची महत्वाची बैठक पार पडली. ज्यात नितीश कुमार यांना विधीमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवडण्यात आले आहे.
एनडीए आमदारांची बिहार विधानसभेच्या इमारतीत बैठक झाली. भाजप नेते सम्राट चौधरी यांनी नितीश कुमार यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, जो एकमताने मंजूर करण्यात आला. त्यानंतर नितीश कुमार यांनी राजभवनात जाऊन राजीनामा दिला आणि सरकार स्थापनेचा दावा केला. उद्या सकाळी भव्य शपथविधी सोहळ्यात ते दहाव्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. त्यांच्यासोबत सम्राट चौधरी आणि विजय सिंह उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. पाटण्यातील ऐतिहासिक गांधी मैदानावर शपथविधी समारंभाची जय्यत तयारी सुरू आहे. एनडीएचे अनेक वरिष्ठ नेतेही या समारंभात सहभागी होतील. स्वतः नितीश कुमारांनी मंगळवारी या सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी गांधी मैदानाला भेट दिली होती.
शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, राजस्थानचे भजन लाल शर्मा, महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार असल्याची माहिती आहेत. याशिवाय पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार विजेते, शास्त्रज्ञ, साहित्यिक आणि इतर उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे एसपीजी गांधी मैदानाच्या सुरक्षेची जबाबदारी घेत आहे. 250 हून अधिक दंडाधिकारी, 250 पोलिस अधिकारी आणि 2500 हून अधिक कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. गांधी मैदानाभोवती असलेल्या उंच इमारतींवर स्नायपर्स तैनात करण्यात आले आहेत.
शपथविधी सोहळ्यासोबतच, एनडीए गांधी मैदानावर देखील शक्तीप्रदर्शन करणार आहे. तीन लाखांहून अधिक लोकांना एकत्र आणण्याची तयारी सुरू आहे. जदयू, भाजपा, आरएलएसपी आणि एचएएमचे कार्यकर्ते आणि नेते यासाठी तयारी करत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी