
चंद्रपूर, 19 नोव्हेंबर (हिं.स.)।
ब्रम्हपुरी शहरालगत असलेल्या बोरगाव रोडवरील रामदेव बाबा सॉलव्हनंटस (आरबीएस) कंपनीच्या इथेनॉल प्रकल्पात बुधवारी सायंकाळी भीषण आग लागली. दरम्यान यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नसून अडीच तासात आग पूर्णपणे आटोक्यात आली आहे.
ब्रम्हपुरीजवळील रामदेव बाबा सॉलव्हनंटस फॅक्टरीच्या समोरील इथेनॉल प्रकल्पात सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास मोठी आग लागली. आग लागल्यानंतर काही क्षणांतच प्रचंड स्फोट झाला आणि त्याचा धक्का तब्बल २ किमीपर्यंत जाणवल्याने जनजीवन काही क्षणासाठी स्थिरावले. या ठिकाणी १.२५ लाख इथेनॉलचा साठा होता. त्या ठिकाणच्या 'डिस्टेन्शन प्लांट'ला आग लागली.
घटना घडल्यानंतर ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, मूल तसेच गडचिरोली आणि वडसा येथील 'फायर ब्रिगेड' पथके तातडीने पोहोचली. आग मोठ्या प्रमाणात असल्याने चंद्रपूर महानगरपालिका येथील दोन 'फायर टेंडर फोम सोल्युशन' सोबत रवाना करण्यात आले.
सदर आग साडे सात वाजता आटोक्यात आली असल्याची पुष्टी सूत्रांनी जोडली. त्यानंतर 'कुलिंग' प्रक्रिया सुरू होती प्राथमिक अहवालात कोणतीही जीवित हानी झालेली नसल्याचे समोर आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव