नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला काँग्रेसची सुरुवात; सपकाळांच्या सभांचा धडाका
मुंबई/बुलढाणा, 19 नोव्हेंबर (हिं.स.)। महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता एकटे पडले आहेत आणि पक्ष फुटेल काय याची चिंता त्यांना सतावू लागली आहे, याच भितीपोटी नाराजी व निषेध नाट्य झाले आहे. ही महायुती विचारासाठी, विकासासाठी किंवा विश्वासासाठी
मुंबई/बुलढाणा


मुंबई/बुलढाणा, 19 नोव्हेंबर (हिं.स.)। महायुतीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता एकटे पडले आहेत आणि पक्ष फुटेल काय याची चिंता त्यांना सतावू लागली आहे, याच भितीपोटी नाराजी व निषेध नाट्य झाले आहे. ही महायुती विचारासाठी, विकासासाठी किंवा विश्वासासाठी नाही तर केवळ सत्तेसाठी झालेली आहे. पण सत्तेसाठी लाचारी बाळगण्यापेक्षा एकनाथ शिंदे यांनी सत्तेतून बाहेर पडावे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

काँग्रेस पक्षाने नगरपालिकेच्या प्रचाराची सुरुवात केली असून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज बुलढाणा जिल्ह्यात प्रचाराला सुरुवात केली. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, सत्तेच्या अनुषंगाने असलेल्या लाचारीपोटी हे तीन पक्ष एकत्र आलेले आहेत. हे गँग्ज ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे, त्यामुळे त्यांच्यात टोळी युद्ध पहायला मिळत आहे. कधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज होऊन सातारा जिल्ह्यातील दरे गावात शेतात जाऊन रुसुन बसतात तर कधी दुसरे उपमुख्यमंत्री गायब होतात. एकनाथ शिंदे यांना निषेध नोंदवायचाच असेल किंवा ते खरेच नाराज असतील आणि काही ठोस घडत नसेल तर त्यांनी सत्तेतून बाहेर पडावे. पण ते सत्तेशिवाय राहू शकत नाहीत म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना कितीही त्रास दिला तरी तो मुकाट्याने सहन करावा लागणार आहे.

अजित पवारांची यशस्वी मांडवली...

पुण्यातील भूखंड प्रकरणावर बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, अजित पवार यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे ‘मला वाचवा’ अशी विणवनी केली, दिल्लीत त्यांची मांडवली झाली आणि पार्थ पवारला क्लिन चिट मिळाली असे दिसते. तसेच देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यातही दिलजमाई झाली असावी. असे नसते तर ९९ टक्के भागिदारी असणाऱ्या पार्थ पवारला सोडून केवळ १ टक्के भागिदारी असलेल्या व काही अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नसती. ७० हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप करुनही भाजपाने अजित पवार यांना सत्तेत घेतलेच, असा टोलाही हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला.

नगरपालिका प्रचाराला सुरुवात..

राज्यातील नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला काँग्रेस पक्षाने सुरुवात केली असून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज बुलढाणा जिल्ह्यातून प्रचार सभांना सुरुवात केली. बुलढाणा, चिखली, मेहकर येथे त्यांनी प्रचार सभा घेत काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन केले. बुलढाण्यातील लढाई संस्कृती विरुद्ध विकृतीची लढाई आहे. विकृतींच्या विरोधात लढताना सर्वांची मोट बांधली पाहिजे. शहरातील लोक पाठिशी आहेत त्यांना सभ्य व सुसंस्कृत बुलढाणा हवा आहे. गुंडगिरी, गांजा, अफिम, भ्रष्टाचारापासून जनतेला मुक्ती हवी आहे असे सपकाळ म्हणाले....

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande