
रायगड, 19 नोव्हेंबर (हिं.स.)। देशाच्या इतिहासातील एक महत्वाचा आणि मार्गदर्शक दिवस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या २५ नोव्हेंबर दिनाची पुन्हा एकदा आठवण करून देत वंचित बहुजन आघाडीने “संविधान सन्मान महासभा” आयोजित केली आहे. २५ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले शेवटचे भाषण भारतीय लोकशाहीचे मूल्य, दिशा आणि धोरण निश्चित करणारे मानले जाते. या भाषणात त्यांनी धर्माला राष्ट्रापेक्षा प्राधान्य देण्याच्या धोक्याबाबत स्पष्ट इशारा देत समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांवर आधारित सामाजिक लोकशाहीचे महत्त्व मांडले होते.
या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधत मंगळवार, २५ नोव्हेंबर रोजी संविधानाचा गौरव, संरक्षण आणि प्रसार यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने “संविधान सन्मान महासभा” आयोजित करण्यात आली आहे. संविधान दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे २६ नोव्हेंबरच्या आधी, दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर संध्याकाळी ४ वाजता हा भव्य कार्यक्रम होणार आहे.
या महासभेत संविधानिक मूल्यांचे रक्षण, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय, लोकशाही आणि मानवी हक्क या मुद्द्यांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात देशभरातील प्रतिष्ठित मान्यवर, सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते, विचारवंत व संविधानप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी देशातील सर्व संविधानप्रेमी जनता, फुले–शाहू–आंबेडकर विचारधारेचे अनुयायी, मानवतावादी आणि लोकशाहीवादी नागरिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. “संविधानाचे रक्षण हेच आजच्या भारताचे सर्वोच्च कर्तव्य आहे,” असे ते म्हणाले. ही महासभा देशातील संविधानिक मूल्यांविषयी जनजागृती आणि एकजूट निर्माण करणारा एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके