कांदिवलीत भरदिवसा विकासकावर गोळीबार
मुंबई, 19 नोव्हेंबर (हिं.स.)। कांदिवलीच्या चारकोप परिसरातील बंदर पाखाडी येथे पेट्रोल पंपासमोर तरुण बांधकाम विकासक फ्रेंडी दिलीमा भाई यांच्यावर अज्ञात दोघांनी गोळ्या झाडल्या आहेत. मुंबईसह पुणे, ठाणे या महानगरांमध्ये वेगाने वाढणाऱ्या बिल्डर्स लॉबीम
shot in broad daylight in Kandivali


मुंबई, 19 नोव्हेंबर (हिं.स.)। कांदिवलीच्या चारकोप परिसरातील बंदर पाखाडी येथे पेट्रोल पंपासमोर तरुण बांधकाम विकासक फ्रेंडी दिलीमा भाई यांच्यावर अज्ञात दोघांनी गोळ्या झाडल्या आहेत.

मुंबईसह पुणे, ठाणे या महानगरांमध्ये वेगाने वाढणाऱ्या बिल्डर्स लॉबीमुळे बांधकाम क्षेत्रातील कोट्यवधींची उलाढाल वाढली असून त्यातून गुन्हेगारीला खतपाणी मिळत असल्याचे चित्र अधिक ठळक होत आहे. धमक्या, खून, अपहरण यांसारखे गंभीर गुन्हे वाढत असतानाच पुन्हा एकदा मुंबईत दिवसाढवळ्या बांधकाम व्यवसायिकावर गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे.

फ्रेंडीभाई कारमध्ये बसलेले असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोन तरुणांनी दोन ते तीन राउंड फायर केले. या हल्ल्यात त्यांच्या पोटात दोन गोळ्या घुसल्या असून त्यांना तात्काळ बोरिवली येथील ऑस्कर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीवर चिकित्सक उपचार सुरू आहेत.

घटनेनंतर हल्लेखोर दोघेही पसार झाले असून चारकोप पोलीस, डीसीपी आणि फॉरेन्सिक टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. भरदिवसा घडलेल्या या गोळीबारानंतर स्थानिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे.

दरम्यान, या घटनेवरून मनसेने पोलिस प्रशासनावर कडक टीका केली आहे. कांदिवली–चारकोप परिसर गुंडांच्या दहशतीखाली गेल्याचा आरोप करत मनसे चारकोप विधानसभा अध्यक्ष दिनेश साळवी यांनी पोलिसांना थेट अल्टिमेटम दिला आहे. “चारकोपमध्ये गोळीबार रोजचाच झाला आहे. नवरात्रीत यादवचा खून, त्यानंतर शेखरवर गोळ्या—या सलग घटनांनी नागरिक त्रस्त झाले आहेत. दहा घरांत तपासणी केली तर एका घरातून गावठी कट्टा निघेल. चारकोपला बिहार बनवू देणार नाही,” असा इशारा साळवी यांनी दिला.

पोलिसांनी घरोगरी तपासणी सुरू करून परिसर गुन्हेगारीमुक्त करावा, अन्यथा मनसे रस्त्यावर उतरून नागरिकांच्या सुरक्षेसाठी उभी राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले. मुंबईत भरदिवसा झालेल्या या गोळीबारामुळे कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande