
नाशिक, 19 नोव्हेंबर, (हिं.स.)। आळंदी अर्थात अलंकापुरी ही पंढरपूर सारखीच पुण्यभूमी आहे. अनेकांना वैकुंठाची अनुभूती ही अलंकापुरीत येत असते. संत ज्ञानेश्वर महाराज आणि भावंडांना समाजाने अनेक प्रकारे त्रास दिला. परंतु समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी हा अन्याय सहन केला. संत ज्ञानेश्वर महाराजांचे विचार आत्मसात करून आचरणात आणावे असे आवाहन संत साहित्याची अभ्यासक तथा श्री सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. तुळशीराम महाराज गुट्टे यांनी व्यक्त केले.
पंचवटीतील अमृतधाम भागातील औदुंबर नगर येथील श्री दत्त मंदिरात चार दिवसांपासून सुरू असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीदिन सोहळ्याचा समारोप झाला. यावेळी त्र्यंबकेश्वर येथील आनंद आखाड्याचे अध्यक्ष महंत शंकरानंद महाराज, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे स्वामी संतोषगिरी महाराज, त्र्यंबकेश्वर येथील रामानंद स्वामी,वारकरी सांप्रदयाचे नवनाथ महाराज शिंदे, माजी नगरसेवक मच्छिंद्र सानप, सोमनाथ बोडके, दिपाली गीते, गौरव गोवर्धने, रमेश वानखेडे,श्याम पिंपरकर, मिशनचे जिल्हाध्यक्ष गणपत हाडपे यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. गुट्टे महाराज यांनी सांगितले की ,संत ज्ञानेश्वर महाराज आणि भावंडांना या समाजाने पाणी, भिक्षा दिली नाही. अनेकांचे कटू शब्द ऐकावे लागले. तरीही माऊलींनी कधीच तक्रार केली नाही. जगाकडून काहीही अपेक्षा ठेवली नाही. त्यांच्या आई-वडिलांचा देखील छळ झाला , त्यात वाळीत टाकले. माऊली जेव्हा ताटी बसले, तेव्हा संत मुक्ताबाई यांनी त्यांची समजूत काढली. जिवंतपणी माउलींना खूप त्रास दिला, परंतु समाधी पूर्वी माऊलींचा भगवान विठ्ठलाकडे शुद्ध तर आळंदीला व वद्य एकादशी मागितली. तेव्हापासून एकादशीला दोन्ही ठिकाणी मोठी गर्दी होते. महाराजांच्या समाधीनंतर अनेकांना आठवणी येत होत्या. माऊलींच्या ज्ञानेश्वरी ची आज समाजाला खरी गरज आहे. “देव हा दाखविण्याचा नव्हे तर अनुभूतीचा विषय आहे. माऊलींच्या समाधीसोहळ्यात साक्षात विठ्ठल प्रकटले. आळंदी म्हणजेच वैकुंठ—पंढरपूरपेक्षा अलंकापुरी ही अनादिकालापासून पुण्यभूमी असून, हा सोहळा या ठिकाणी होत असल्याने नाशिकच्या लोकांचे भाग्य असल्याचे डॉ. गुट्टे महाराज यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV