हयात प्रमाणपत्राचा अंतिम टप्पा सुरू; ३० नोव्हेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन
रायगड, 19 नोव्हेंबर (हिं.स.)। पेन्शन मिळत राहण्यासाठी दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात हयात प्रमाणपत्र सादर करणे सर्व पेन्शनधारकांसाठी बंधनकारक आहे. यंदा प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर निश्चित करण्यात आली असून आता या प्रक्रियेस फक्त १०
हयात प्रमाणपत्राचा अंतिम टप्पा सुरू; पेन्शन वाचवण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करा


रायगड, 19 नोव्हेंबर (हिं.स.)। पेन्शन मिळत राहण्यासाठी दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात हयात प्रमाणपत्र सादर करणे सर्व पेन्शनधारकांसाठी बंधनकारक आहे. यंदा प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख ३० नोव्हेंबर निश्चित करण्यात आली असून आता या प्रक्रियेस फक्त १० दिवसांचा अवधी उरला आहे. अंतिम मुदतीत प्रमाणपत्र न दिल्यास डिसेंबरपासून पेन्शन रोखली जाण्याची शक्यता असल्याने पेन्शनधारकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

केंद्र सरकारचे पेन्शनधारक आता घरबसल्या सहजपणे डिजिटल हयात प्रमाणपत्र देऊ शकतात. मोबाईल, टॅबलेट किंवा लॅपटॉपवर इंटरनेट, आधार क्रमांक आणि फेस ऑथेंटिकेशनच्या साहाय्याने ही प्रक्रिया काही मिनिटांत पूर्ण करता येते. नव्या आधार-आधारित फेस रिकग्निशन प्रणालीमुळे बायोमेट्रिक मशीन, अंगठ्याचा ठसा किंवा प्रत्यक्ष बँकेत जाण्याची गरज उरलेली नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि जलद झाली आहे. तसेच आपल्या परिसरातील ऑनलाईन केंद्रांवरही डिजिटल प्रमाणपत्र मिळू शकते.

मात्र राज्य सरकारच्या पेन्शनधारकांसाठी अद्याप डिजिटल प्रणाली सर्वत्र कार्यान्वित झालेली नसल्याने त्यांना प्रत्यक्ष बँक किंवा कोषागार कार्यालयात जाऊन हयात प्रमाणपत्र सादर करावे लागत आहे. त्यामुळे या वर्गातील निवृत्त कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर अखेरचा अवधी गाठण्यासाठी घाई करावी लागत आहे.

दरवर्षी सादर करण्यात येणारे डिजिटल जीवन प्रमाणपत्र एक वर्षासाठी वैध असते. त्यामुळे पेन्शनधारकांनी प्रमाणपत्र सादर करण्याची अंतिम तारीख—३० नोव्हेंबर—कुणत्याही परिस्थितीत चुकवू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. पेन्शन बंद होण्याचा धोका टाळण्यासाठी तत्काळ हयात प्रमाणपत्र सादर करणे अत्यावश्यक ठरत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande