

* आदिवासींची लोप पावत चाललेली समृद्ध संस्कृती जतन करण्यासाठी वन आहार महोत्सवाचे आयोजन
मुंबई, 19 नोव्हेंबर (हिं.स.) - मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या महानगरांत रहाणाऱ्या नागरिकांना आदिवासी लोक, त्यांची संस्कृती, त्यांची खाद्यसंस्कृती यांविषयी कायमच एक कुतुहल असते. जेव्हा ही संस्कृती अनुभवायला मिळते, तेव्हा तो शहरी नागरिकांसाठी एक विलक्षण अनुभव असतो. हाच विलक्षण अनुभव घेण्याची संधी २२ आणि २३ नोव्हेंबरला मिळणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात दुपारी ४ ते रात्री १० या वेळेत वन आहार महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील पावरा समाजाच्या खाद्यसंस्कृतीचा अनुभव महोत्सवाच्या माध्यमातून घेता येणार आहे. पोष फाऊंडेशनच्या अमोघ सहजे यांच्या संकल्पनेतून या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, पंचमहाभूते फाऊंडेशन, दादर सांस्कृतिक मंच या संस्थांचे या महोत्सवास सहकार्य आहे.
या वन आहार महोत्सवात पावरा आदिवासींच्या विलक्षण आणि अतिशय रुचकर पदार्थांची चव चाखायला मिळणार आहे. त्या भागांत आढळणाऱ्या रानफुलांचा चहा, ज्याला 'डोमखा' म्हणातात, तसेच याच फुलांपासून बनवला गेलेला एक जॅम, चविष्ट रानभाज्या, दक्षिण भारतीय डोशाशी साधर्म्य असलेला हिता हा प्रकार, त्यांच्या भाकऱ्या असे विविध पदार्थ या महोत्सवात चाखायला मिळणार आहेत. याशिवाय अगदी ज्युरॅसिक पार्कमधील वाटावे, असे लाथाडो हे फळ, विविध कंदमुळे, कणसं यांचाही आस्वाद घेता येणार आहे.
विलक्षण पावरा संस्कृती वाचवण्याचा प्रयत्न
नंदुरबारमधील नर्मदा खोऱ्यात राहणाऱ्या पावरा आदिवासी समाजाची संस्कृती विलक्षण आहे. नंदुरबारमधील अतिशय दुर्गम, डोंगराळ भागांत आदिवासी रहातात. या गावांमध्ये कुठल्याही सोयी - सुविधा उपलब्ध नाहीत. शिक्षणाच्याही सोयी अपुऱ्याच आहेत. सातत्याने निसर्गाच्या प्रतिकूलतेशी झगडावे लागत असल्याने हे सर्वच लोक अतिशय काटक, मजबूत शरीराचे असतात. यांच्यात इतकी कौशल्ये दडली आहेत की, पोहणे, गिर्यारोहण, तिरंदाजी यांसारख्या खेळांत ते कसलेल्या आंतरराष्ट्रीय खेळाडूंना देखील मागे टाकतील. यांची भाषा, त्यांची वेशभूषा, त्यांचे आचार - विचार, त्यांच्या लोककथा या सर्वच एक विलक्षण अनुभव देणाऱ्या आहेत. काळाच्या रेट्यामुळे या सर्वच गोष्टी किती टिकतील हा प्रश्नच निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांच्या संवर्धनासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न होणे गरजेचे आहे. वन आहार महोत्सवाच्या माध्यमातून या दिशेने प्रयत्न करण्यात येणार आहेत.
पोष फाऊंडेशनचा पुढाकार
आदिवासी संस्कृतीच्या संवर्धनासाठी अमोघ सहजे पोष फाऊंडेशनच्या माध्यमातून काम करतात. आजच्या तंत्रज्ञानाच्या आक्रमणाच्या काळात ही संस्कृती जपण्यासाठी काम करणे गरजेचे आहे. हीच गरज ओळखून हा वनआहार महोत्सव आयोजित केला आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून जो निधी उभा रहाणार आहे, त्यातून आदिवासी समुदायाच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असे अमोघ सहजे म्हणाले.
'वन आहार' महोत्सवाला भेट द्या - मंजिरी मराठे यांचे आवाहन
''नंदुरबार जिल्यातील पावरा आदिवासी बांधव सुदृढ असण्याचं कारण म्हणजे त्यांची खाद्य संस्कृती. या आपल्या बांधवांच्या संस्कृतीचे संवर्धन झालं नाही, तर त्यांची खाद्य, वाद्य, संगीत संस्कृती; त्यांची कला, भाषा लोप पावेल. त्यामुळे त्यांच्या संवर्धनाचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आयोजित केलेल्या 'वन आहार' महोत्सवाला भेट द्या, या उपक्रमाचा भाग व्हा'', असे आवाहन स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी