आयएसएएमच्या 64 व्या वार्षिक परिषदेचे आयोजन
नवी दिल्‍ली, 19 नोव्हेंबर (हिं.स.)। बेंगळूरू येथील इन्स्टिटयूट ऑफ एअरोस्पेस मेडिसिन या संस्थेत दिनांक 20 आणि 21 नोव्हेंबर या कालावधीत इंडियन सोसायटी ऑफ एअरोस्पेस मेडिसिन (आयएसएएम) या संस्थेच्या 64 व्या वार्षिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. हवाई द
Indian Society of Aerospace Medicine (ISAM)


नवी दिल्‍ली, 19 नोव्हेंबर (हिं.स.)। बेंगळूरू येथील इन्स्टिटयूट ऑफ एअरोस्पेस मेडिसिन या संस्थेत दिनांक 20 आणि 21 नोव्हेंबर या कालावधीत इंडियन सोसायटी ऑफ एअरोस्पेस मेडिसिन (आयएसएएम) या संस्थेच्या 64 व्या वार्षिक परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंग यांच्या हस्ते उद्या, 20 नोव्हेंबर रोजी या परिषदेचे उद्घाटन होणार आहे.

देश आणि परदेशातील सुमारे 300 प्रतिनिधी या परिषदेमध्ये सहभागी होतील. तसेच संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) प्रयोगशाळांमध्ये आणि भारतीय अवकाश संशोधन संस्थेत (इस्रो) कार्यरत प्रमुख शास्त्रज्ञ यांच्यासह इतर संबंधित संस्थांतील संशोधक देखील या परिषदेत सहभागी होणार आहेत.

या परिषदेतील महत्त्वाच्या कार्यक्रमांमध्ये अंचित गुप्ता या उत्साही इतिहासकारातर्फे दिले जाणारे एअर मार्शल सुब्रोतो मुखर्जी स्मरणार्थ व्याख्यान आणि एअर व्हाईस मार्शल दीपक गौर (निवृत्त) यांचे एअर व्हाईस मार्शल एम.एम.श्रुंगेश स्मरणार्थ व्याख्यान यांचा समावेश आहे.

सदर परिषदेतील आणखी एक महत्त्वाचे व्याख्यान म्हणजे ‘जेमी होरमुसजी फ्रामजी माणेकशॉ पथका’तील वक्त्यांची व्याख्याने. या कार्यक्रमात पिक्सेल एअरोस्पेस टेक्नोलॉजीजचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आवैस अहमद आणि इंडिगो एअरलाईन्स या विमान कंपनीचे मुख्य विमान सुरक्षा अधिकारी कॅप्टन ध्रुव रेब्बाप्रागदा या प्रख्यात तज्ञ अतिथींची व्याख्याने होणार आहेत.

या वेळची परिषद ‘एअरोस्पेस मेडिसिन क्षेत्रातील नवोन्मेष: अगणित शक्यता’ या संकल्पनेवर आधारित आहे. ही संकल्पना वैमानिकांची सुरक्षितता आणि कामगिरीविषयक कमाल आवश्यकता यांचा समतोल साधण्यासाठी एअरोस्पेस मेडिसिन क्षेत्रातील व्यावसायिकांचे नाविन्यपूर्ण दृष्टीकोन अधोरेखित करते.

या परिषदेमध्ये 100 हून अधिक वैज्ञानिक संशोधन निबंध सादर केले जाणार असून यावेळी उपस्थित प्रतिनिधींना देशातील एअरोस्पेस मेडिसिन संशोधन क्षेत्राचे भविष्य आणि धोरणे यांना आकार देण्याच्या उद्देशाने आयोजित वैज्ञानिक चर्चा, सादरीकरणे आणि नेटवर्किंग म्हणजेच सामाजिक, व्यावसायिक संबंध निर्माण करण्यासाठी परस्पर संपर्क करण्याच्या संधी अशा भरगच्च कार्यक्रमपत्रिकेचा अनुभव घेता येईल.

वर्ष 1952 मध्ये स्थापन झालेली आयएसएएम ही भारतातील एअरोस्पेस मेडिसिन क्षेत्राचे ज्ञान आणि पद्धती यांना चालना देण्याप्रती समर्पित असलेली एकुलती एक नोंदणीकृत संस्था आहे. ही वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रमुख संस्था देशातील अंतराळ उड्डाण कार्यक्रमाच्या मानवी पैलुंसह लष्करी तसेच नागरी एअरोस्पेस मेडिसिन क्षेत्रात कार्यरत आहे. संशोधनात प्रगती करणे, माहितीच्या आदानप्रदानाला चालना देणे आणि एअरोमेडिकल आव्हानांवर उपाय शोधणे या उद्दिष्टांसह कार्यरत असलेली आयएसएएम ही संस्था वर्ष 1954 पासून त्यांच्या वार्षिक वैज्ञानिक परिषदेचे आयोजन करत आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande